Ground Zero : बबनरावांची माघार, मुलगा मैदानात… श्रीगोंद्यात विरोधकांना सुगीचे दिवस?
अहमदनगरमधील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ (Shrigonda Assembly Constituency). या मतदारसंघात ऊसाचे अमाप पीक. कारखानेही बरेच. अगदी तसेच राजकीय पुढाऱ्यांचे पीक देखील या मतदारसंघात जोमात असते. नगरमधील अकरा मतदारसंघ एकीकडे आणि हा मतदारसंघ एकीकडे इतके राजकीय पुढारी या एका मतदारसंघात आहेत. कधी हे नेते एकमेकांना मदत करतात. तर कधी-कधी एकमेंकावर राजकीय कुरघोड्या करतात. पण या मतदारसंघात 44 वर्षांत दोन अपवाद वगळता बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) किंग ठरलेले आहेत. ते तब्बल सात वेळा आणि तेही वेगवेगळ्या चिन्हावर या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. पण यंदा पाचपुते निवडणुकीतून माघार घेणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे इतर इच्छुकांना सुगीचे दिवस येण्याची शक्यता आहे. पण मतदारसंघ कुणाच्या वाटेला जाणार, श्रीगोंद्याची जनता कोणाला साथ देणार? आणि कुणाची डोकेदुखी वाढू शकते?
पाहुया लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या विधानसभा निवडणूक विशेष सिरीजमध्ये…
श्रीगोंदा मतदारसंघातून बबनराव पाचपुते 1980 आणि 1985 मध्ये जनता पक्षाचे आमदार राहिले. 1990 साली जनता दलाच्या तिकीटावर निवडून आले. पुढची निवडणूक काँग्रेसकडून (Congress) लढवत विजयी झाले. तेव्हा ते सलग चार वेळेस आमदार झाले. 1999 मध्ये राष्ट्रवादीच्या (NCP) तिकीटावर मात्र पाचपुते पराभूत झाले. 2004 ला अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आणि पुन्हा आमदार झाले. 2009 मध्ये राष्ट्रवादीच्या (NCP) तिकीटावर निवडून आले. या सर्व काळात पाचपुते हे तीनदा मंत्री राहिलेले आहे. गृहराज्य मंत्री, आदिवासी मंत्री, वनमंत्री, नगरचे पालकमंत्री अशी पदे त्यांनी सांभाळली. एकदा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षही राहिले.
2014 साली मोदी लाटेत पाचपुते यांनीही पक्ष बदलत भाजपची वाट धरली. तेव्हा शरद पवार यांनी राहुल जगताप यांच्यासारखा जिल्हा परिषद सदस्य राहिलेला उमेदवारला रिंगणात उतरविले. जगतापांनी तब्बल तेरा हजार मतांनी पाचपुतेंना पराभूत केल. तोवेळी श्रीगोंद्यातील इतर नेतेही पाचपुतेंविरोधात रिंगणात उतरले होते. 2019 च्या निवडणुकीत मात्र पडद्यामागून सूत्र फिरली आणि राहुल जगताप यांनी ऐनवेळी माघार घेतली. त्यावेळी राष्ट्रवादीने घनश्याम शेलारांना तिकीट दिले. शेलारांनी पाचपुतेंना तगडी फाइट दिली. पण चार हजार मतांनी का होईना पाचपुते सातव्यांदा विजयी झाले.
Ground Zero : शरद पवारांचा डोळा फडणवीसांच्या मोहऱ्यावर… मुश्रीफांविरोधात समरजीत घाटगेंचे नाव?
आता जागा वाटपाच्या सुत्रानुसार ज्या पक्षाचा विद्यमान आमदार आहे, त्या पक्षाला तो मतदारसंघ सुटणार आहे. त्यामुळे श्रीगोंदा मतदारसंघावर महायुतीत पहिला दावा असणार आहे तो भाजपचाच. सध्याचे भाजप आमदार पाचपुते हे वैयक्तिक कारणांमुळे मतदारसंघात कमी उपलब्ध असतात. त्यामुळे त्यांचे पुत्र विक्रमसिंह हे मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. ते सहाचिकच भाजपकडुन इच्छुक आहेत. या मतदारसंघात नगर तालुक्यातील 35 गावे येतात. या गावांमध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांचे वर्चस्व आहे.
परंतु लोकसभेच्या निवडणुकीत निलेश लंके यांनी या भागात जबरदस्त मते घेतलेली आहेत. पण स्थानिक राजकारणात कर्डिलेंचे वर्चस्व असल्याने त्यांनी या मतदारसंघावर दावा केला तर भाजपला इथून उमेदवार देताना नाकीनऊ येऊ शकते. अजितदादांच्या राष्ट्रवादीकडूनही या जागेवर दावा सांगितला जात आहे. नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व त्यांची पत्नी अनुराधा नागवडे हे दोघेही अजितदादांकडे उमेदवारी मागत आहे. याशिवाय राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, दत्तात्रय पानसरे असे स्थानिक नेतेही अजितदादांकडे आहे.
महाविकास आघाडीमध्ये या जागेवर शरद पवार गटाचा दावा आहे. गतवेळी माघार घेतलेले राहुल जगताप हे पुन्हा इच्छुक आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते हे शड्डू ठोकून आहेत. त्यांच्या उमेदवारीसाठी स्वतः संजय राऊत हे इच्छुक आहे. घनश्याम शेलार हे अनेकदा केलेल्या पक्षांतरामुळे नगर जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहिले आहेत. यंदा ते काँग्रेसच्या तिकिटावर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात लढण्यास इच्छुक आहेत. परंतु महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा कोणाला जाते यावर शेलारांची पुढील समीकरणे अवलंबून असणार आहेत. अशा परिस्थितीत अपक्ष म्हणून एखाद्याने उमेदवारी केल्यास येथे तिरंगी लढत होऊ शकते.
अमृता पवारांचं चॅलेंज, माणिकराव शिंदेंही मैदानात… भुजबळांसाठी ‘येवला’ अवघड?
हा मतदारसंघ बायागती आहे. ऊसाचे मळे आहेत. त्यामुळे या तालुक्यात कुकडीतून वेळेत आवर्तन न सुटल्यास पिकांचे नुकसान होते. आवर्तन वेळेत मिळावे, यासाठी नेत्यांनी प्रयत्न करावा, अशी मागणी सातत्याने होत असते. तसेच नगर तालुक्यातील साकळाई योजना मार्गी लावावी, अशी मागणी येथील मतदार करत आहेत. सरकारी पातळीवर, स्थानिक नेत्यांनी प्रयत्न केले आहेत. या योजनेच्या सर्वेक्षणाला देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी देऊन निधीही दिलीय. त्यामुळे एकंदरीत हे सगळं चित्र पाहता हा मतदारसंघ कुणाला जाईल, कोण उमेदवार रिंगणात उतरतील हे उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतरच समोर येईल. परंतु तोपर्यंत उमेदवारीसाठी सर्वच उमेदवार आपली ताकद पणाला लावत आहेत हे नक्की.