Download App

टुणकन उडी मारणारा आमचा पक्ष नाही; अमोल मिटकरींचा राज ठाकरेंना टोला

  • Written By: Last Updated:

Amol Mitkari Critisize Raj Thackeray : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दोन दिवसांपूर्वी उद्योगपती चोरडिया यांच्या निवासस्थानी भेट झाली. या भेटीत त्यांच्यात अर्धा तास खलबतं झाली. त्यावरून चर्चांना उधाण आलं. काल कोल्हापुरात बोलताना अजित पवारांनी चोरडिया यांच्या घरातून बाहेर पडलेल्या आणि धडकेल्या गाडीत मी नव्हतो, असं सांगितलं. त्यावर आज राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मिमिक्री करत जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे सांगितल्यानंतर हे सर्व लोक टुणकन भाजपसोबत गेले, अशी टीका त्यांनी केली. दरम्यान, राज ठाकरेंच्या या टीकेला आता अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

आज माध्यमांशी बोलतांना मिटकरी यांना राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेबाबत विचारले असता अमोल मिटकरी म्हणाले की, कोहिनूर मील संदर्भात ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे टुणकन उडी मारली, तशी टुणकून उडी मारणारा आमचा पक्ष नाही. आम्ही सत्तेसोबत आहोत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात आगपाखड करणाऱ्या व्यक्तीला जेव्हा कोहिनूरच्या माध्यमातून ईडीची नोटीस मिळते. मग ते विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपली भूमिका बदलतात. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या पटलावर कुठेही ते दिसत नाहीत.

चिकन डिश ऑर्डर केली, प्लेटमध्ये दिले उंदराचे मांस; मुंबईतील धक्कादायक प्रकरण 

ते म्हणाले, राज ठाकरे यांच्याकडे फक्त एकच आमदार आहे. त्यांनी तो आमदार सांभाळून ठेवावा. त्यांनी अजित पवारांची मिमिक्री करू करू नये. पण आम्ही काही बोललो की, त्यांची टोळधाड सुटते. त्यामुळं जे लोक ईडीची नोटीस मिळाल्यावर भूमिका बदलतात, त्यांनी अजित पवारांवर भाष्य करणं म्हणजे, सूर्याला वाकुल्या दाखवण्याचा प्रकार आहे, असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला.

भाजप कानपट्टीवर बंदूक ठेऊन लोकांना पक्षात घेतं. मग हेच लोक गाडीत लपून जातात, या राज ठाकरेंनी केलेल्या टीकेविषयी बोलतांना मिटकरी यांनी सांगितलं की, राज ठाकरेंनी भूमिका बदलली तेव्हा कुठं बंदूक ठेवली होती? भाजपची तुम्ही स्तुती करत होता, तेव्हा भाजप गोड होतं. ईडीची नोटीस मिळाल्यावर त्यांनी भूमिका बदलली. मग भाजपने त्यांच्या कुठं बंदुक ठेवली होती, हे त्यांनी एकदा सांगाव, असंही मिटकरी म्हणाले.

राज ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरे म्हणाले, अजित पवारांनी विचारलं की, आपण या सरकारमध्ये का आलात? त्यावर ते म्हणाले, “आम्ही महाराष्ट्राचा विकास करायला आलो आहोत”. अरे कशाला खोटं बोलता. सहा दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी काढली ना तुमची… पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, महाराष्ट्रात 70 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. मग हे सगळेजण टुणकन भाजपबरोबर आले. कारण, छगन भुजबळांनी अजित पवारांना सांगितलं असणार. आत (तुरुंगात) काय काय असतं.

 

Tags

follow us