Assembly Election BJP Candidate Mumbai : विधानसभेच्या तारखांची घोषणा झाल्यापासून सगळ्यांचं लक्ष उमेदवारांच्या नावांच्या यादीकडे लागलेलं होतं. अखेर भाजपनं (BJP) पहिली यादी जाहीर करत 99 उमेदवारांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. या यादीत भाजपने शेलार बंधू यांना देखील विधानसभेचं तिकीट (Assembly Election) दिल्याचं दिसतंय. आशिष शेलार यांच्यासह त्यांच्या मोठ्या बंधूंना देखील विधानसभा निवडणुकीची उमेदवारी भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी दिलीय. तर मुंबईत एकूण 14 जांगावर भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत, परंतु यातील 3 आमदारांना प्रतिक्षेत ठेवल्याचं दिसतंय.
भाजपने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपली पहिली यादी जाहीर केलीय. या यादीमध्ये 2014 पासून सलग दोन वेळा आमदारकीची निवडणूक लढवणारे विद्यमान भाजप आमदार आणि मुंबई (Mumbai) भाजप अध्यक्ष ऍड. आशिष शेलार यांना पुन्हा वांद्रे पश्चिम मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर झालीय. विशेष म्हणजे, आशिष शेलार यांचे मोठे भाऊ भाजप प्रदेश प्रवक्ते, मुंबई भाजप सचिव विनोद शेलार यांना देखील मालाड पश्चिम मतदारसंघामधून उमेदवारी देण्यात आलीय. विनोद शेलार पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरत आहेत.
यंदा दोन्ही शेलार बंधू विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. आशिष शेलार यांनी सलग दोन वेळेस विधानसभा निवडणूक लढवलेली आहे. तर विनोद शेलार यांची ही पहिलीच वेळ आहे. ते 2012 – 2017 दरम्यान नगरसेवक होते. मागील विधानसभा निवडणुकीत मुंबईतील 36 जागांपैकी 16 जागांवर गुलाल उधळला होता. 2009 पासून सलग तीन वेळा आमदार राहिलेले कॉंग्रेसचे अस्लम शेख यांचं विनोद शेलार यांना कडवं आव्हान असेल, अशा चर्चा सुरू आहेत.
मुंबईतल्या 14 जागांवर भाजपचे उमेदवार कोण?
दहिसर विधानसभा मतदारसंघात मनीषा चौधरी, मुलुंड विधानसभा मतदारसंघात मिहिर कोटेचा, कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात अतुल भातखळकर, चारकोप विधानसभा मतदारसंघात योगेश सागर, मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघात विनोद शेलार, गोरेगाव विधानसभा मतदारसंघात विद्या ठाकूर, अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अमित साटम, विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात पराग आळवणी, घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघात राम कदम, वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात आशिष शेलार, सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघात कॅप्टन तमिल सेल्वन, वडाळा विधानसभा मतदारसंघात कालिदास कोळंबकर, मलबार हिल विधानसभा मतदारसंघात मंगलप्रभात लोढा तर कुलाबा विधानसभा मतदारसंघात राहुल नार्वेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय.