नाशिक : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणी सुरू आहे.पहिल्या फेरीत सत्यजित तांबे यांनी आघाडी घेतली आहे.
पहिल्या फेरी अखेर अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे हे 8266 मतांनी आघाडीवर आहेत. सत्यजित तांबे यांना पहिल्या फेरीअखेरीस एकूण 15784 पहिल्या पसंतीची मते मिळाली आहेत, तर महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेल्या उमेदवार शुभांगी पाटील यांना पहिल्या पसंतीची 7862 एवढी मते मिळाली आहेत. तसेच या मतदारसंघात मते बाद होण्याचे प्रमाण जास्त आहे. पहिल्या फेरी अखेरीस 2739 मते बाद झाली आहेत. त्यामुळे आता विजयासाठी लागणाऱ्या मतांचा कोटा कमी झाला आहे. परिणामी ही मतमोजणी शेवटच्या फेरीपर्यंत रंगण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. सत्यजीत तांबे यांच्या समर्थकांनी त्यांच्या विजयाचा जल्लोष करणारे लावलेले बॅनर्स उतरवावे लागतील, असा इशारा शुभांगी पाटील यांनी दिला. त्यामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निकाल काय लागणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.