Download App

शिरसाट यांच्याविरोधात ठाकरेंची खेळी; भाजपचा जुना शिलेदार जड जाणार?

औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे संजय शिरसाट विरुद्ध शिवसेना (UBT) पक्षाचे राजू शिंदे अशी लढत होणार

एकनाथ शिंदे यांचे बंड झाल्यानंतर, ते मुख्यमंत्री झाल्यानंतर एका नेत्याने माध्यमांसमोर नेटाने खिंड लढवली. या नेत्याचे नाव म्हणजे संजय शिरसाट (Sanjay Shirsat). शिरसाट यांनी पहिल्याच दिवसापासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लक्ष्य केले. तसे एक पत्रच काढले होते. आता याच शिरसाट यांच्या एका-एका टीकेचे आणि विधानांचे उट्टे काढण्यासाठी ठाकरे यांनी फिल्डिंग लावली आहे. एका बड्या नेत्याला पक्षात घेत विधानसभेसाठी ताकद देण्याचा प्रयत्न केला आहे. नेमका कोण आहे हा नेता आणि यंदा संजय शिरसाट यांना पश्चिम औरंगाबाद मतदारसंघात रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काय रणनीती आखली आहे? (Aurangabad West assembly constituency, Shiv Sena’s Sanjay Shirsat will fight against Shiv Sena’s (UBT) Raju Shinde.)

पाहुया लेट्सअपच्या ग्राउंड झिरो या सिरिजमधून जाणून घेऊया…

छत्रपती संभाजीनगर शहराच्या विकासाचे जनक ठरलेल्या काँग्रेसच्या डॉ. रफिक झकेरिया यांचा हा जुना मतदारसंघ. 1962, 1967, 1972 असे तीन टर्म त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे ते राजकारणात आले होते. तब्बल 15 वर्षे ते विविध खात्यामध्ये ते मंत्री होते. शहर वसवण्यात आणि शहराच्या औद्योगिकरणात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यानंतर अब्दुल अजिम, अमानुल्ला मोतीवाल यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. तब्बल सहा टर्म मतदारसंघात काँग्रेसच्या ताब्यात होता.

परंतु शिवसेनेच्या भगव्या वादाळासमोर काँग्रेसचा पालापाचोळा झाला आणि चंद्रकांत खैरेंचा बोलबोला सुरू झाला. 1990 ते 1995 असे दोन टर्म खैरे इथून निवडून आले. 1995 मध्ये खैरेंविरोधात काँग्रेसने लोकमत समूहाच्या राजेंद्र दर्डा यांनी मैदानात उतरविले. पण खैरेंसमोर दर्डांचा टिकाव लागला नाही. दर्डांचा 50 हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला. 1999 ला खैरे हे खासदार म्हणून निवडून गेले आणि विधानसभेला दर्डा येथून सहज विजय झाले. त्यावेळी दर्डा व शिवसेनेचे गजानन बारवल यांच्यात लढत झाली होथ. 2004 लाही दर्डाच विजयी झाले. त्या कालावधीत ते वेगवेगळे खात्याचे मंत्री राहिले.

औरंगाबाद पूर्व : MIM पुन्हा मदतीला येणार; ‘अतुल सावे’ तिसऱ्यांदा गुलाल उधळणार?

पण 2009 ला पश्चिम मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. त्यामुळे दर्डांना आपला मुक्काम पूर्व मतदारसंघात हलवावा लागला. इकडे राखीव मतदारसंघात महापालिकेतून राजकारणात आलेल्या शिरसाट यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. 2009 च्या पहिल्याच निवडणुकीत ते विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे चंद्रभान पारखे यांचा पंधरा हजार मतांनी पराभव केला. शिरसाट यांनी तब्बल 58 हजार 008 मते घेतली होती. तर पारखे यांना 43, 797 हजार मते मिळाली होती.

2014 मध्ये सर्व पक्ष स्वतंत्र लढले. या निवडणुकीत संजय शिरसाट 61 हजार मते घेत पुन्हा विधानसभेत गेले. त्यावेळी भाजपच्या मधुकर सावंत यांनी 54 हजार 355 मते घेत फाइट दिली होती. एमआयएमच्या पाठिंब्यांवर दलित चळवळीतील गंगाधर गाडे यांनी तब्बल 35 हजार 348 मते घेतली होती. तर काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र देहाडे हे 14,789 मते घेऊन थेट चौथ्या क्रमांकावर राहिले होते.

2019 च्या निवडणुकीत देखील संजय शिरसाट हे सहज निवडून आले. 83 हजार 792 मते घेत त्यांनी चब्बल चाळीस हजार मतांनी विजय मिळविला होता. त्यावेळी भाजपचे राजू शिंदे हे अपक्ष रिंगणात उतरले होते. त्यांनी 43 हजार 347 मते घेतली होती. तर एमआयएमच्या अरुण बोर्डे यांना 39 हजार मते मिळविली होती. वंचितचे संदीप शिरसाट यांनी पंचवीस हजार मते घेतली होती.

औरंगाबाद मध्य : शिंदे-ठाकरे भांडत बसणार अन् MIM पुन्हा चार्ज होणार?

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेच्या संदिपान भुमरे यांना 95 हजार 586 मते मिळाली. तर चंद्रकांत खैरे यांना 58 हजार आणि इम्तियाज जलील यांना 54 हजार मते मिळाली. आता ज्याचा आमदार, त्याला जागा या सूत्रानुसार ही जागा महायुतीमध्ये शिवसेनेले जाईल. त्यामुळे संजय शिरसाट हे चौथ्यांदा मैदानात उतरतील हे तर स्पष्ट आहे.

त्याचवेळी महाविकास आघाडीत ही जागा घेण्यासाठी उद्धव ठाकरे जास्त प्रयत्नशील आहेत. ठाकरे गटाकडून शिरसाट यांची कोंडी करण्यासाठी रणनीतीही आखण्यात आली आहे. गेल्यावेळी अपक्ष रिंगणात असलेले भाजपचे राजू शिंदे आता ठाकरे गटात आहेत. त्यांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. शिंदे माजी नगरसेवक असून, त्यांची या भागात चांगली ताकद आहे. तर काँग्रेसकडून जितेंद्र देहाडे हे इच्छुक आहेत. एमआयएमकडून पुन्हा अरुण बोर्डे हे तयारी करत आहेत.

या मतदारसंघात मुस्लिम आणि दलित समाजाचे एकगठ्ठा मतदान आहे. पण एमआयएम आणि वंचितचे स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरल्यानंतर संजय शिरसाटांना निवडणूक सोपी जाते हे गेल्या दोन निवडणुकीत दिसून आले आहे. त्यामुळे शिरसाट यांना खिंडीत गाठण्यासाठी ठाकरे यांनी चेहरा शोधला आहे. पण निवडणुकीत जिंकण्यासाठी त्या चेहऱ्याला किती ताकद मिळते हे महत्त्वाचे आहे.

follow us