औरंगाबाद मध्य : शिंदे-ठाकरे भांडत बसणार अन् MIM पुन्हा चार्ज होणार?
औरंगाबाद शहराचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे आणि विभागाचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे झाले आहे. मात्र निवडणूक आयोगाने अद्याप मतदारसंघाचे नाव बदलले नाही. त्यामुळे इथे ‘औरंगाबाद मध्य’ असा उल्लेख झाला आहे.
मराठवाड्यात शिवसेनेने (Shivsena) शिरकाव केल्यापासून ‘खान की बाण’ याच मुद्द्यावर निवडणुका फिरत राहिल्या. यात मतदारांनी कायमच शिवसेनेच्या धनुष्य-बाणाला पसंती दिली. पण 2014 साली पहिल्यांदाच एमआयएमने (MIM) मराठवाड्याच्या मैदानात एन्ट्री घेतली. पुण्यातील पत्रकारिता सोडून राजकारणाच्या मैदानात उतरलेले इम्तियाज जलिल (Imtiyaz Jaleel) औरंगाबाद मध्य मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले. महापालिका, आमदारकी, खासदारकी असे सगळे सेनेकडे असताना हा चमत्कार घडला होता. 2019 मध्ये इम्तियाज जलिल थेट लोकसभेच्या (Lok Sabha Election) रिंगणात उतरले. त्यांना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची साथ मिळाली. हर्षवर्धन जाधव यांनीही अपक्ष उडी घेतली. त्यांच्या उमेदवारीने मतविभागणीचे समीकरण परफेक्ट बसले आणि जलील यांच्यारुपाने महाराष्ट्रात एमआयएमचा पहिला खासदार निवडून आला.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र इम्तियाज जलील यांचा पराभव झाले. थोड्या-थोडक्या नाही तर तब्बल एक लाख 34 हजारांच्या मतांनी. महापालिकेच्या निवडणुका नसल्याने पक्षाच्या वाढीला मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे एमआयएम पक्ष बॅकफूटला गेल्याचे चित्र आहे. पण आगामी विधानसभा निवडणुकीत कमबॅक करण्यासाठी जलील सज्ज आहेत. त्याचवेळी खासदार निवडून आल्याने शिवसेनेचा कॉन्फिडन्स वाढला आहे. उद्धव ठाकरेही मराठवाड्यावर आपला होल्ड पुन्हा तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी संभाजीनगर शहर त्यांच्यासाठी महत्वाचे असणार आहे. यात औरंगाबाद मध्य मतदारसंघ पुन्हा एकटा ‘हॉट’ ठरणार आहे. दोन शिवसेना, एमआयएमचा उमेदवार अशी तगडी फाइट होण्याचे चिन्ह आहे. (Aurangabad Central Constituency will be contested between Shiv Sena’s Pradeep Jaiswal vs MIM’s Imtiaz Jalil vs Shiv Sena (UBT) Kishanchand Tanwani.)
लेट्सअपच्या ग्राउंड झिरो या स्पेशल सिरीजमध्ये समजून घेऊ कशी असेल औरंगाबाद मध्य मतदारसंघातील यंदाची लढत…
2009 पर्यंत संभाजीनगर शहरात पूर्व आणि पश्चिम हे दोनच मतदारसंघ होते. पुनर्रचनेत मध्य हा तिसऱ्या मतदारसंघ अस्तित्वात आला. पहिल्याच निवडणुकीत मतदारसंघात अपक्ष उमेदवार प्रदीप जैस्वाल यांनी बाजी मारली. जैस्वाल हे शिवसैनिक असताना शिवसेनेने विकास जैन यांना उमेदवारी दिली. पण जैन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना 33 हजार 988 मते मिळाले. तर दुसऱ्या क्रमांकाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सय्यद अब्दुल कदीर अमीर होते. त्यांना 41 हजार 581 मते मिळाली होती.
2014 ची निवडणूक ही संभाजीनगरसाठी सर्वार्थाने वेगळी होती. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस या प्रमुख चारही पक्षाचे उमेदवार रिंगणात होते. पण एमआयएमने पत्रकार राहिलेल्या इम्तियाज जलिल यांना उमेदवारी दिली. वेगवेगळे लढल्याचा फटका सेना-भाजपला बसला, हिंदुत्ववादी मतांची विभागणी झाली आणि पहिल्याच निवडणुकीत जलिल यांनी वीस हजार मतांनी बाजी मारली. त्यांना 61 हजार 843 मते मिळाली होती. प्रदीप जैस्वाल हे 41 हजार 861 मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिले. भाजपचे किशनचंद तनवाणी हे 40 हजार 770 मते घेत तिसऱ्या क्रमांकावर राहिले. राष्ट्रवादीचे विनोद पाटील हे अवघे 11 हजार 842 मतेच घेऊ शकले.
Ground Zero : नाना पटोले पुरुन उरणार? ‘साकोली’ भाजपला अवघडच!
2019 च्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलिल हे लोकसभेला उभे राहिले आणि जिंकूनही आले. त्यावेळी तिरंगी लढत झाली होती. शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यातील मतविभाजन जलिल यांच्या पथ्थ्यावर पडले होते. जलिल यांच्या विजयात औरंगाबाद मध्य मतदारसंघाचा मोठा वाटा होता. जलिल यांना येथून तब्बल 99 हजार 450 मते मिळाली होती. तर खैरे यांना 50 हजार मते मिळाली होती.
पण 2019 च्या विधानसभेला चित्र पालटले होते. एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये फूट पडली होती. शिवसेनेने पुन्हा एकदा प्रदीप जैस्वाल यांना रिंगणात उतरविले. त्यांची एमआयएमचे नसिरुद्दीन ताकीउद्दीन सिद्दीकी यांच्याविरोधात फाइट झाली. त्यात जैस्वाल हे तब्बल 82 हजार 217 मते घेऊन विजयी झाले. सिद्दीकी यांना 68 हजार 325 मते मिळाली होती. वंचितच्या अमित भुईगल यांना तब्बल 27 हजार मते मिळाली. एमआयएम-वंचित बहुजन आघाडी ही फूट शिवसेनेसाठी फायद्याची ठरली.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही इम्तियाज जलील हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यात मध्य आणि पूर्व या दोन मुस्लिम बहुल मतदारसंघात जलील यांना चांगली मते मिळाली. पूर्व मतदारसंघात 93 हजार आणि मध्य मतदारसंघातून 86 हजार मते मिळाली होती. त्यामुळे अजूनही एमआयएमला मानणारी मुस्लिम व्होट बँक असल्याचे दिसून येत आहे. मध्य मतदारसंघात सध्या शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल आमदार आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेलाच जाईल, हे स्पष्ट आहे. तर उद्धव ठाकरे गटाकडून हा मतदारसंघ मागितला जात आहे. संभाजीनगरमध्ये शिवसेनेला मानणारा मतदार असल्याने ठाकरे हा मतदारसंघ महाविकास आघाडीतील इतर पक्षांना सोडणार नाहीत. ठाकरे गटाकडून किशनचंद तनवाणी यांचे नाव चर्चेत आहे.
Ground Zero : ‘कोल्हापूर उत्तर’च कोडं : बंटी पाटील, क्षीरसागर यांच्या डोक्याला ताप
एमआयएममध्येही इच्छुकांची संख्या मोठी आहे. माजी खासदार इम्तियाज जलिल, महानगरपालिकेचे माजी गटनेते नासेर सिद्दिकी, माजी जिल्हाध्यक्ष समीर बिल्डर हे इच्छुक आहेत. अशा परिस्थितीमध्ये दोन्ही शिवसेनेला आणि एमआयएममुळे इथली लढत तिरंगी होईल. दोन शिवसेनेच्या मत फुटीचा फायदा एमआयएम उठवू शकते. परंतु सध्या एमआयएममध्येच इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यात एमआयएममध्ये बंडखोरी झाल्यास मात्र या मतदारसंघाचे चित्र हे वेगळेच राहील.
दुसऱ्या बाजूला गेल्या काही दिवसांपासून इम्तियाज जलील हे वेगळे संकेत देत आहेत. ते मध्यंतरी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना भेटले होते. तर एमआयएम महाविकास आघाडी सोबत जाण्यास तयार आहेत, असे संकेतही जलील यांनी दिले आहेत. एमआयएम हा पक्ष हा इंडिया आघाडीत आला तर त्याचा राज्यात महाविकास आघाडी आणि एमआयएमला फायदा होऊ शकते. तसेही मुस्लिम मतदार हा काहीशी प्रमाणात एमआयएमपासून दूर गेल्याचे देशभरात दिसून आले आहे. ते महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना एकगठ्ठा मतदान करतात हे लोकसभेच्या निवडणुकीच्या आकडेवारीत समोर आलेले आहे. एमआयएम महाविकास आघाडीत गेल्यास ही जागा एमआयएमला सोडली जाणार का? आणि ठाकरे सोडण्यास तयार होणार का? हा प्रश्न आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेचा राहणार हे नक्की.