Avinash Brahmankar BJP’s candidates for the Bhandara-Gondiya Legislative Council Patole was given a tough fight in Assembly : सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांच्या विधान परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये भंडारा गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघची जागा भाजपच्या वाट्याला आली आहे. या ठिकाणी भाजपने दिलेल्या उमेदवाराची चर्चा सुरू आहे. उमेदवार म्हणजे नाना पटोले यांना विधानसभा निवडणुकीमध्ये कडवी झुंज देणारे अविनाश ब्राह्मणकर हे आहेत.
राष्ट्रवादीकडून पुण्याच्या जागेसाठी विक्रम काकडे यांच्या नावाची घोषणा, टिंगरेही अर्ज दाखल करणार
दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा बहुचर्चित तिढा अखेर सुटला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बैठका, चर्चासत्रे आणि राजकीय वाटाघाटींनंतर 17 जागांसाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतिम सहमती झाली आहे. या फॉर्म्युल्यानुसार भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर निवडणूक लढवणार आहे. यामध्ये भंडारा-गोंदियामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
कोण आहेत अविनाश ब्राम्हणकर?
अविनाश ब्राह्मणकर यांची मुख्य ओळख म्हणजे त्यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष राहिलेले नाना पटोले यांना कडवी झुंज दिली होती. त्या निवडणुकीत नाना पटोले हे केवळ 208 मतांनी विजय झाले होते. साकोली विधानसभा मतदारसंघ आणि भंडारा जिल्ह्यावर नाना पटोलेंची मजबूत पकड आहे. पटोलेंचे भंडाऱ्यावरील वर्चस्व कमी करण्यासाठी भापजने अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून आयात केलेल्या अविनाश आनंदराव ब्राह्मणकर यांना संधी दिली होती. यामध्ये अवघ्या 208 मतांनी नाना पटोले यांना आपला गड राखण्यात कसेबसे यश आलं होतं. याचीच पावती म्हणून आता भाजपने ब्राह्मणकरांना ही संधी दिल्याचं बोललं जात आहे.
