Sambhaji Maharaj On Badlapur Rape : गैरप्रकार रोखण्यासाठी लोकांनीच कठोर भूमिका घेतली तर शासनाने समाजातील बेगडी मानवतावाद्यांनी लोकांना दोष देऊ नये, अशी प्रतिक्रिया स्वराज्य संघटनेचे संभाजी महाराज छत्रपती (Sambhaji Maharaj Chatrapati) यांनी बदलापूर घटनेवर दिलीयं. दरम्यान, बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना समोर आलीयं. या घटनेवर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जातोयं. संभाजी महाराजांनीही संताप व्यक्त केला यासंदर्भातील पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलीयं.
ना कायद्याचा धाक… ना समाजाचा चाप !
कोलकाता येथील घटनेतील सर्व आरोपी अद्याप पकडले गेले नाहीत. उरण येथील घटना ताजी असतानाच नुकतीच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दहावीत ९६% मिळविलेल्या एका १६ वर्षांच्या मुलीने विकृत मेकॅनिक मुलाच्या अघोरी त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. आता बदलापूर…— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 20, 2024
संभाजी महाराज शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाले, “ना कायद्याचा धाक…ना समाजाचा चाप! कोलकाता येथील घटनेतील सर्व आरोपी अद्याप पकडले गेले नाहीत. उरण येथील घटना ताजी असतानाच नुकतीच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दहावीत ९६% मिळविलेल्या एका १६ वर्षांच्या मुलीने विकृत मेकॅनिक मुलाच्या अघोरी त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. आता बदलापूर येथील शाळेत चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याचे उघडकीस येत आहे. संपूर्ण देशभरात कोणतेच सरकार महिलांना सुरक्षिततेची हमी देण्यास कमी पडत आहे. विकृती वाढीस लागली आहे. आरोपींना वेळीच पकडले जात नाही. पकडले तरी कठोर शिक्षा होत नाही. कित्येक तर निर्दोष सुटून जातात. देशात कायद्याचा धाक राहिला नाही..! अशा गैरप्रकारांना रोखण्यासाठी लोकांनीच कठोर भूमिका घेतली, तर शासनाने आणि समाजातील बेगडी मानवतावाद्यांनी लोकांना दोष देऊ नये”, असं संभाजी महाराजांनी पोस्टमध्ये म्हटलंय.
नेमकं काय घडलं?
बदलापूरमध्ये अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित संस्था ही बदलापूरमधील नामांकित शाळा आहे. येथील एका सफाई कर्मचाऱ्याने काही दिवसांच्या अंतराने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालक आणि बदलापूरमधील नागरिक प्रचंड संतापले आहेत. बदलापूर बंदची हाक देण्यात आली असून नागरिकांचा मोर्चा शाळेच्या गेटवर जाऊन धडकला आहे.
दरम्यान, या घटनेविरोधात संतप्त झालेल्या बदलापुरकरांनी रेल्वे स्थानकावर दिवसभर चक्काजाम आंदोलन केलं. आंदोलन थांबवण्यासाठी राज्य सरकारकडून आवाहन करण्यात आलं. त्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनीही आंदोलकांना विनवणी केली, मात्र, महाजनांच्या आश्वासनाला केराची टोपली दाखवत आंदोलकांनी आंदोलन सुरुच ठेवलं. अखेर सायंकाळी 6 च्या सुमारास पोलिसांवरच आंदोलकांनी दगडफेक केल्यानंतर पर्यायाने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यानंतर आंदोलकांना पांगवण्यात पोलिसांना यश आलंय.