महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे ( MNS ) नेते बाळा नांदगावकर ( Bala Nandgaonkar ) यांनी आपल्या शिवसेना ( Shivsna ) पक्ष सोडण्यासंबंधीची आठवण सांगितली आहे. मी बाळासाहेब ठाकरे यांना सांगून पक्ष सोडला, असे नांदगावकर यांनी सांगितले. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. एकनाथ शिंदे व सहकाऱ्यांनी शिवसेना आमचीच असे म्हणत, पक्ष सोडला नाही, यावर तुम्हाला काय वाटते, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी हे उत्तर दिले आहे.
मी राजसाहेब यांच्या प्रेमाखातर बाहेर पडलो होतो. या अगोदर बरेच लोक पक्ष सोडून गेले होते. पण मी एकमेव असा आमदार होतो की, रीतसर मातोश्रीवर जाऊन बाळासाहेब , उध्दव साहेब, आणि वहिनींना जाऊन भेटलो आणि त्यांना सांगुनच बाहेर पडलो. त्यानंतर मी राजसाहेब यांना भेटलो. आता जे बाहेर पडले तेव्हा त्यांना जे योग्य वाटले ते त्यांनी केले, त्यावेळी जे मला योग्य वाटलं ते मी केले, असे म्हणत त्यांनी आपण शिवसेना कशी सोडली याची आठवण सांगितली.
तसेच आता त्यांच्या हातात सत्ता होती म्हणून ते बाहेर पडले, असे म्हणत त्यांनी शिंदे गटाला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. माझ्या हातात मेहनत होती आणि मी मेहनत करतोय. माझ्या नेत्यावर मला विश्वास आहे की हा माणूस लाथ मारेल तिथे पाणी काढू शकतो. विहिरीतले पाणी खोल खोदल्या नंतरच येते थोडा वेळ लागतोच, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान बाळा नांदगावकर यांनी 2005 साली शिवसेना सोडली होती. त्यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. या त्यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.