Download App

सावित्रीबाईंबद्दल आक्षेपार्ह लिखाण प्रकरण; आरोपींच्या मुसक्या नाहीतर फाशीच.., फडणवीसांचाही आक्रमक पवित्रा

सोशल मीडिया तसेच वेबसाईटवर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण प्रसिद्ध झाल्याच्या मुद्द्यावरून आज विधानसभेत विरोधकांसोबतच राज्य सरकारकडूनही संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. सावित्रीबाईंचा अपमान करणाऱ्यांना मुसक्या बांधून आणले पाहिजे, अशी आक्रमक भूमिका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मांडली. त्यावर क्रांतीज्योती सावित्रीबाईंचा अपमान करणाऱ्याच्या मुसक्या बांधण्याचे तुम्ही बोलत आहात, पण आमचे मत आहे की, अशा आरोपीला भररस्त्यात फाशी दिली पाहिजे, अशी भूमिका उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण प्रकरण अधिवेशनात चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यास अद्याप अटक का नाही? असा संतप्त सवाल करीत सत्ताधाऱ्यांना चांगलचं घेरलं आहे. आव्हाडांपाठोपाठ काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरातांनीही आक्रमक पवित्रा घेत सभागृह दणाणून सोडलं आहे. दरम्यान, विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही प्रत्युत्तरात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘भारत वॉच स्पिक’ ट्विटर हॅंडलवरुन सावित्रीबाई फुलेंबद्दल आक्षेपार्ह लिखाण करण्यात आल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. त्यानंतर आक्षेपार्ह लिखाणाची पोस्ट अनेक वेबसाईटमध्ये शेअर करण्यात आलं होतं. प्रत्युत्तरात या घटनेचा देवेंद्र फडणवीसांनीही निषेध केला असून या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु असून ट्विटर हॅंडलच्या माहितीसाठी आत्तापर्यंत पोलिसांनी ट्विटरला तीन पत्रे लिहिलं असल्याचं फडणवीसांना स्पष्ट केलं आहे.

पाकिस्तानवर उपासमारीची वेळ, ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये 99व्या क्रमांकावर घसरण

तसेच आम्हीही या घटनेचा निषेध करीत असून ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदु पोस्ट’ यांच्यावरही गुन्हा दाखल केला असून डिजिटल पेपर्स हे व्यासपीठ आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याची ग्वाहीच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. यासोबतच सावित्रीबाई फुलेच नाहीतर महापुरुषांबाबत कोणीही लिखाण केलं तरीही कारवाई होणारच असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.

थोरातांनी दिला राहुल गांधींच्या विधानाचा दाखला :
सत्य बोलणाऱ्या राहुल गांधी यांना बोलण्यापासून रोखण्यासाठी आपण दोन वर्षांची शिक्षा करतात आणि दुसरीकडे विकृत गुन्हेगार मोकाट फिरतात. हा कसला न्याय? असा सवालही थोरात यांनी सरकारला केला.

दरम्यान, विरोधकांच्या संतापानंतर फडणवीसांनीही आक्रमक भूमिकेत उत्तर दिलं खरं पण या उत्तराने विरोधकांचं समाधान न झाल्याने विरोधकांनी सभात्याग केला आहे. अद्याप आरोपींबाबत कोणतीही ठोस माहिती सरकारला जमा करता आली नाही, असा आरोप करत विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाही दिल्या आहेत.

Tags

follow us