सकाळपर्यंत सांगितलं बंडखोरी करणार नाही पण त्यांनी… रविंद्र चव्हाण भिवंडी प्रकरणावर संतापले

सकाळपर्यंत ते आम्ही बंडखोरी करणार नाही असं सांगत होते. तरी त्यांनी बंडखोरी केली.

  • Written By: Published:
Bhiwandi

भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेत (Bhiwandi) महापौर निवडीवरुन आज मोठा राजकीय भूकंप झाला. भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळे संतापलेल्या नारायण चौधरी यांनी पक्षादेश झुगारून बंडखोरी केली आणि चक्क काँग्रेस-राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) पाठिंब्यावर महापौरपदाची खुर्ची खेचून आणली. भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांचा दारूण पराभव झाला असून, त्यांना तिसऱ्या क्रमांकाच्या मतांवर समाधान मानावं लागल आहे. या घटनेनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कारवाईचा इशारा दिला आहे.

भिवंडी महापालिकेच्या या निवडणुकीत सुरुवातीला भाजपने नारायण चौधरी यांचं नाव निश्चित केलं होतं. मात्र, ऐनवेळी चक्रे फिरली आणि स्नेहा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. पक्षाच्या निर्णयामुळे नाराज झालेल्या चौधरी यांनी तात्काळ भाजपमधील ६ नगरसेवकांसह भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना केली. सभागृहात झालेल्या हात वर करून मतदानाच्या प्रक्रियेत चौधरी यांनी विजयासाठी आवश्यक आकडा सहज पार केला. त्यांना मिळालेल्या ४८ मतांमध्ये खालील पक्षांचा समावेश होता.

शिंदेसेनेने कोणार्क विकास आघाडीच्या विलास पाटील यांना पाठिंबा दिला, ज्यांना २५ मते मिळाली. भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांच्या पारड्यात केवळ १६ मतं पडली. भाजपने यापूर्वी चंद्रपूरमध्ये कमी संख्याबळ असतानाही ज्या प्रकारे आपला महापौर बसवला होता, त्याच खेळीचा वचपा काँग्रेसने भिवंडीत काढल्याची चर्चा आहे. भाजपने दिलेलाच उमेदवार फोडून, त्याला आपला पाठिंबा देऊन निवडून आणत काँग्रेसने भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे.

यामध्ये महत्त्वाचे म्हणजे, महायुतीत फूट पडल्याने भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढले, ज्याचा फायदाही बंडखोर गटाला झाला. दरम्यान आता नारायण चौधरी यांच्या विजयानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भिवंडी महापालिकेच्या महापौर पदाबाबत काय करता येईल यासंदर्भात स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरु होती. नारायण चौधरी यांना महापौर पदासाठी अर्ज भरण्यास सांगितले होते. कारण त्यांनी आम्हाला कळवलं होतं. पण नंतर तिथे अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे स्नेहा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असं चव्हाण म्हणाले.

तसंच, काल संध्याकाळपासून ते सकाळपर्यंत नारायण चौधरी यांना असं करु नका म्हणून समजवण्याचा प्रयत्न केला होता. पक्षाच्या विरोधात गेलात तर तुमच्यावर कारवाई केली जाईल असं सांगितलं होतं. सकाळपर्यंत ते आम्ही बंडखोरी करणार नाही असं सांगत होते. तरी त्यांनी बंडखोरी केली. त्यामुळे ज्यांनी पक्षाचा व्हीप पाळला नाही त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, असं प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे.

follow us