Download App

भरत गोगावलेंचा रश्मी ठाकरेंवर निशाणा, सेनेतील फुटीवर म्हणाले, ‘रश्मी वहिनींमुळे शिवसेना…’

  • Written By: Last Updated:

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविरुद्ध बंड करत एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे शिवसेनेत (Shiv Sena) उभी फूट पडली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पक्षाच्या ५५ पैकी ४० आमदारांनी तर लोकसभेच्या १३ खासदारांनी पाठिंबा दिला. शिवसेनेतील या फुटीला उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूचे लोक कारणीभूत असल्याचे आरोप केले. रश्मी ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश केल्यानेच शिवसेनेची सगळी अडचण सुरु झालीये, असेही आरोप झाले. दरम्यान, आता शिवसेनेचे नेते भरत गोगावले (Bharat Gogavale) यांनी शिवसेना फुटीचे कारण सांगत असताना माजी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत.

एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये गोगावले यांनी सांगितले की, आम्ही उद्धव साहेबांकडे आमच्या अडचणी, मतदारसंघातील समस्या घेऊन जात होतो, पण त्यावेळी उद्धव साहेबांनी आम्हाला वेळ दिला नाही. बरं, काँग्रेस आणि राष्ट्रवादीबद्दल आम्ही जेव्हा जेव्हा काही तक्रार करायचो, तेव्हाही ते त्याकडे गांभीर्याने पाहत नसत. तसेच कोणताही निर्णय घेत नसत. त्यामुळे आमच्या भावना तयार होत गेल्या की, आता यांना आमची गरज नाही. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि माझं कुटुंब एवढ्यापुरतंच ते मर्यादीत राहिले होते. तसेच उद्धव साहेबांच्या घरच्यांचा पक्ष संघटनेत अतिरिक्त हस्तक्षेप व्हायला लागले. त्यांचे मेव्हणे, भाचे आणि वहिनी कळत-नकळत हस्तक्षेप करत होत्या, असा आरोप भरत गोगावले यांनी केला.

गोगावले म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झालेला बदल लोकांना देखील जाणवला होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्णयात माँसाहेबांनी कधीच हस्तक्षेप केला नाही. उलट माँसाहेबांनी कार्यकर्त्यांना प्रेम दिलं. म्हणून माँसाहेबाप्रती शिवसैनिकांचा आई-वडीलांपेक्षाही जास्त आदर तयार झाला. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल द्वेष निर्माण होण्याची कारणं तपासली पाहीजेत. सत्ता असताना आमदार, खासदार, नगरसेवक पक्षाला सोडून गेले, याचे कुठेतरी चिंतन करायला हवं, असंही गोगावले यांनी सांगितलं.

तुम्ही शिवसेना संपवली की, वाचवली? या प्रश्नावर प्रतिक्रिया देतांना गोगावले म्हणाले की, आम्ही आतापर्यंत शिवसेना वाचवण्याचाच प्रयत्न केला. आम्ही बाळासाहेबांचा एकही शब्द इकडे-तिकडे केला नाही. बाळासाहेबांचं नाव आणि विचार घेऊनच आम्ही पुढे चाललो आहो. उद्धव साहेबांना बाळासाहेबांचं नाव घेऊन पुढं चालता आलं असतं. पण, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव त्यांना सुचलं. पण, एकनाथ शिंदे यांनात बाळासाहेबांची शिवसेना नाव सुचलं. आम्ही शिवसेना संपवली नाही. बाळासाहेबांचं नाव घेऊन आणि विचार घेऊनच आम्ही काम करतो आहोत, असं गोगावले यांनी सांगितलं.

बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष करुन आपला राजकीय वारसदार केलं. पण ते त्यांचा वारसा कितपत चालवतील, याची कल्पना बाळासाहेबांना तेव्हा नव्हती, असाही आरोपही गोगावलेंनी केला. कारण, उद्धव ठाकरे यांच्याकडे कार्याध्यक्षपद आल्यानंतर अनेक दिग्गज नेते शिवसेना सोडून गेले. तेव्हा साहेबांनाही याची प्रचिती आली होती. त्यामुळे याचे आत्मचिंतन करणे गरजेचे होते, असे ते म्हणाले.

Earthquake : तुर्की पाठोपाठ आता इंडोनेशियात भूकंपाचे धक्के, 6.3 रिश्टर स्केलची नोंद

शिवसेनेने व्हिप बजावल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना अपात्र ठरविण्याची वेळ आली तर काय कराल? असा प्रश्न विचारल्यानंतर गोगावले म्हणाले की, आम्ही त्यासंदर्भात पक्षातंर्गत चर्चा करणार आहोत. पण उद्धव ठाकरे यांनी कोर्टकचेरी, निवडणूक आयोगाकडं जाणं असले प्रकार न करता समोरासमोर लढायला हवं. ते कोर्टात जातात, म्हणून आम्हालाही कोर्टात जावं लागतं. तुम्ही अडीच वर्ष काम केलं? असे बोलतात. त्याप्रमाणे आम्ही देखील कामातून उत्तर देत आहोत. आम्ही त्यांच्या तोंडाला तोंड देणार नाही, अशी भूमिका गोगावले यांनी व्यक्त केली.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर त्यांनी हा आरोप केला. यावरही भरत गोगावले यांनी भाष्य करत राऊतांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, राऊतांना आता महाराष्ट्रातील जनता गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे केवळ लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी ते असे काहीतरी खोटे आरोप करत आहेत. राऊतांमुळे आमच्यावर एवढं मोठं काही संकट आलं नाही आहे. त्यामुळे त्यांना मारण्याचा प्रश्नच येत नाही. आणि कशाला कोणी आपले हात खराब करून घेर्ईल, असा टोलाही त्यांनी लगावला.

 

Tags

follow us