अहमदनगर : लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election) पराभवानंतर भाजप (BJP) नेते आणि माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी आपला मोर्चा विधानसभेकडे वळविला आहे. मला आता वेळ असून शेजारी कुठे संधी मिळाली तर विधानसभा निवडणूक लढवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. ज्या तालुक्यांमध्ये उमेदवाराच्या नावाबाबत समन्वय होणार नसेल आणि तिथे माझ्या नावावर एक मत झाल्यास मी लढवण्यास तयार आहे. यातही श्रीरामपूर राखीव आहे. कोपरगावचे राजकारण क्लिष्ट आहे. त्यामुळे संगमनेर आणि राहुरी हेच दोन पर्याय माझ्यासमोर आहेत, असे म्हणत सुजय विखे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले. (BJP leader and former MP Sujay Vikhe Patil has said that he will contest the assembly elections.)
पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावर बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले, शिर्डी विधानसभा ही राधाकृष्ण विखे पाटील यांच्याच नेतृत्वाखालीच लढली जाईल, अशी माझी अपेक्षा आहे. कारण पक्षाचा निर्णय होणे अद्याप बाकी आहे. तिकीट कोणाला मिळणार हा प्रक्रियेचा भाग आहे. शेवटी पक्ष निर्णय घेईल, पक्ष त्यांना संधी देईल. पण आमच्या दृष्टिकोनातून आमच्या परिवारात साहेबच सर्वप्रथम आहेत.
राहिला माझा मुद्दा, तर आता मला बऱ्यापैकी वेळ आहे, त्यामुळे आजूबाजूंच्या मतदारसंघाचा आढावा घेऊ, आणि कुठे काही संधी असेल तर पाहू. कोणत्या मतदारसंघातून या प्रश्नावर विखे पाटील म्हणाले, श्रीरामपूर मतदार संघ राखीव आहे. कोपरगावचे राजकारण आधीच क्लिष्ट आहे. त्यामुळे राहुरी आणि संगमनेर हेच पर्याय माझ्यासमोर आहेत. कारण याही तालुक्यात अनेकजण इच्छुक आहेत. त्यांच्यात एकमत झाले नाही आणि माझ्या नावावर एकमत झाले तर आपण तयार आहोत. माझे काम फक्त अर्ज करायचे आहे. पक्षाने आदेश दिला तर, त्यानुसार आपण पुढे निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, सुजय विखे पाटील यांनी ज्या दोन मतदारसंघांमध्ये तयारी सुरु केली आहे त्यापैकी संगमनेरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात आमदार आहेत. तर राहुरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्राजक्त तनपुरे आमदार आहेत. तिथेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार शिवाजीराव कर्डिले हेही भाजपमधून विधानसभेची तयारी करत आहेत. त्यामुळे सुजय विखे पाटील हे आता विधानसभा निवडणूक लढवणार का? आणि लढवली तर कोणत्या मतदारसंघातून लढविणार हे पाहणे महत्वाचे आहे.