Chandrasekhar Bawankule On INDIA : मुंबईत उद्या आणि परवा असे दोन दिवस इंडिया (INDIA) आघाडीची महत्त्वाची बैठक होत आहे. काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी महत्त्वाचे नेते मुंबईत पोहोचले आहेत. देशातील विरोधी पक्षांनी मिळून इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यापासून रोखणे हा या आघाडीचा उद्देश आहे. दरम्यान, भापजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी इंडिया आघाडीवर टीका केली. विरोधकांची आघाडी म्हणजे बारूद नसलेला बॉम्ब आहे, अशी खरमरीत टीका त्यांनी केली.
बावनकुळे हे आज माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला. ते म्हणाले की, इंडिया आघाडीचे घटक पक्ष मुंबई बैठकीसाठी एकत्र आले आहेत. ही त्यांची नौटंकी असून ते मुंबईत येतील, हॉटेलमध्ये राहतील, दोन दिवस फिरतील आणि निघून जातील. त्यांच्या बैठकीत कोणतंही तथ्य नाही. त्यांच्या आघाडीत कुणीही कुणासोबत नाही. ‘इंडिया’ आघाडी म्हणजे, ‘बारूद नसलेला बॉम्ब’ असून त्यांच्याकडून काहीच होणार नाही, अशी खरमरीत टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
मंत्रिमंडळ समितीतून विखेंना डावललं; मंत्री विखे पाटील काय म्हणाले?
ते म्हणाले, आघाडीत 10-12 पक्ष असे आहेत, त्यांचे कुठेही मंत्री देखील नाहीत. पंतप्रधान मोदींच्या विरोधात महाराष्ट्रात काही करता येईल का? असा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, महाराष्ट्रात भाजप लोकसभेच्या ४५ हून अधिक जागा जिकेंल, असा विश्वास व्यक्त करत माझ्या लोकसभा प्रवासात लोक मोदी-मोदी असे नारे लावून समर्थन करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
काँग्रेसने केला डॉ. बाबासाहेबांचा पराभव
प्रकाश आंबेडकर यांना विरोधी आघाडीचे निमंत्रण नाही, या प्रश्नावर बावनकुळे यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, प्रकाश आंबेडकरांना बोलवण्याचा त्यांचा निर्णय असला तरी त्यांची भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कधीच मान्य केली नाही. काँग्रेस नेहमीच डॉ. आंबेडकर विरोधात राहिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव कॉंग्रेसनेच केला होता. तेव्हाही आणि आजही त्यांची भूमिका कायम आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात जो कुणी त्यांच्या संकल्पाला साथ देण्यासाठी येईल, त्यांचे एनडीएत स्वागत केलं जाईल, असंही ते म्हणाले.
काँग्रेसने कर्नाटकातील जनतेचा विश्वासघात केला!
काँग्रेसने कर्नाटकच्या जनतेला निवडणुकीत दिलेले वचन ते कधीच पूर्ण करू शकणार नाही, त्यांनी कर्नाटकातील जनतेचा विश्वासघात केला आहे. 10 वर्षांचे बजेट जरी 5 वर्षांत खर्च केले तरी देखील ती आश्वासने पूर्ण होणार नाही, असं ते यावेळी म्हणाले.