Chandrashekhar Bawankule On Sharad Pawar : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला. बिहारच्या पाटणा येथे विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत 19 पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचे बावनकुळे म्हणाले होते. त्यावर पवारांनी असे वक्तव्य म्हणजे पोरकटापणा असल्याचे म्हणत बावनकुळेंचे वक्तव्य धुडकावले होते. पण त्यावर बावनकुळेंनी ट्विटच्या माध्यमातून पवारांना सणसणीत टोला लगावला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पवार साहेब, पोरकट आणि स्वतःच्याच मुलाबाळांना सत्ता मिळाली म्हणून कोण राजकारण करत आहे हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्याध्यक्ष निवडताना सुध्दा तुम्हाला राष्ट्रवादीचा सच्चा कार्यकर्ता दिसला नाही आणि तुम्ही सुप्रियाताईंच्या हाती सूत्र दिली यातच सर्व आलं. कार्याध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करायची हा तुमचा प्रश्न आहे. पण देश वाचविण्याच्या नावाखाली तुम्ही विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहात पण तुमची एकजूट देशासाठी नाही तर तुमच्या परिवाराला सत्ता मिळावी यासाठी आहे. हे लोकांना माहीत आहे, असे म्हणत बावनकुळेंनी शरद पवारांना सुनावले.
आदरणीय पवार साहेब,
पोरकट आणि स्वतःच्याच मुलाबाळांना सत्ता मिळाली म्हणून कोण राजकारण करत आहे हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्याध्यक्ष निवडताना सुध्दा तुम्हाला राष्ट्रवादीचा सच्चा कार्यकर्ता दिसला नाही आणि तुम्ही सुप्रियाताईंच्या हाती सूत्र दिली…— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) June 26, 2023
तसेच मोदीजींच्या नेतृत्त्वाखाली गेल्या नऊ वर्षांत जनतेचं राज्य सुरू आहे पण तुम्हाला ते बघवत नाही. म्हणून तुम्ही आमच्या राजकारणाला पोरकट राजकारण म्हणून हिणवत आहात पण जनता तुमच्या ‘मेरा घर – मेरे बच्चे’ मोहिमेला साथ देणार नाही. कोण पोरकट राजकारण करतंय आणि कोण देशहिताचं राजकारण करतंय? हे २०२४ मध्ये जनता तुम्हाला दाखवून देईल, अशा शब्दात बावनकुळेंनी पवारांवर निशाणा साधला.
अजित पवारांचा निर्णय कोण घेणार? शरद पवारांचे सूचक विधान
काय आहे वाद
काही दिवसांपूर्वी देशातील विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक पाटणा येथे झाली. या बैठकीसाठी राज्यातून शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आदी नेते उपस्थित होते. या बैठकीवर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या बैठकीत 19 जण हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचा खोचक टोला लगावला होता.
त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी देखील निशाणा साधला. अशा प्रकारचं जे भाष्य करतात ते पोरकटपणाचे भाष्य आहे. या बैठकीमध्ये पंतप्रधानपदाची चर्चादेखील झाली नाही. तुम्ही बैठका घेतल्या तर चालतात मात्र आम्ही बैठका घेतल्या तर चालत नाही. ज्याला मॅच्युअर पॉलिटिक्स म्हणतात, ते दिसून येत नाही, असे म्हणत पवारांनी बावनकुळेंना टोला लगावला होता.