BJP leader Chitra Wagh campaign for Atul Bhosle : महायुतीचे उमेदवार (Mahayuti Candidate) डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ ओंड येथे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी (Chitra Wagh) जाहीर सभेला संबोधित केलं. कोरोनाच्या काळात लाडक्या बहिणींच्या पाठीशी डॉ. अतुलबाबा भोसले भावासारखे उभे राहिले. कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी महिलांना आणि संपूर्ण जनतेला मोठी सेवा दिली. अशावेळी या भागातील लोकप्रतिनिधी काय करत होते, असा सवाल करत भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ओंड (ता. कराड) येथे आयोजित महिला संवाद मेळाव्यात माजी आमदार पृथ्वीराज चव्हाणांवर तोफ डागली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला निवडणुकीचा जुमला म्हणून हिणवणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना या निवडणुकीत धडा शिकवा, असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित महिलांना केलंय.
भाजपा (BJP) – महायुतीचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले (Atul Bhosle) यांच्या प्रचारार्थ ओंड येथे भव्य महिला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला महिला मतदारांचा उदंड प्रतिसाद लाभला. व्यासपीठावर उमेदवार डॉ. अतुल भोसले, उत्तरा भोसले, गौरवी भोसले, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्वाती पिसाळ, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा डॉ. सुरभी भोसले, कराडच्या माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होत्या.
शिंदे-फडवणवीसांचे सरकार उखडून टाका, त्यांनी महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला…; जयंत पाटलांचे टिकास्त्र
यावेळी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, महाविकास आघाडीचे नेते खोटे पण रेटून बोलणारे चोर आणि लुटेरे आहेत. त्यांनी गोरगरीब, आदिवासींचे आरक्षण काढून घेण्यात येणार असल्याची भीती घातली. देशात ७० वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसने महिलांसाठी काय केले? असा प्रश्न उपस्थित करत, मोदींनी उज्वला योजना, जनधन योजना, मोफत धान्य, लखपती दीदी योजना, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण अशा अनेक कल्याणकारी योजना राबवल्याचे सांगितले.
राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने ‘लाडकी बहीण’ कल्याणकारी योजना राबवली. मात्र, ही योजना बंद पाडण्यासाठी त्याच बहिणींचे सावत्र भाऊ कोर्टात गेले. तसेच या योजनेसाठी सरकारी तिजोरीत पैसा नसल्याचे धादांत खोटे सांगत महिलांना पैशांची लाच देऊ नका, अशी भाषा वापरली. अशा सावत्र भावांना या निवडणुकीत जागा दाखवा. तसेच या मतदारसंघातील दीड लाख बहिणींनी अतुलबाबांच्या पाठीशी उभे राहत त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन चित्रा वाघ यांनी केले.
डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले की, कराडच्या एमआयडीसीला फाईव्ह स्टारचा दर्जा देण्याची मागणी मी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. त्याबद्दल त्यांनी सकारात्मकता दर्शविली असून, याठिकाणी लवकरच मोठे उद्योग येतील. या माध्यमातून कराड दक्षिणसह तालुक्यातील अनेक महिलांच्या हाताला रोजगार मिळवून देण्याचे काम करणार आहे. आपला लाडका भाऊ, मुलगा म्हणून आपण मला मतरुपी आशीर्वाद द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित माता – भगिनींना केलंय.
कोरोनाच्या काळात कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ. सुरेश भोसले आणि डॉ. अतुलबाबा भोसले यांनी माता भगिनी, तसेच गोरगरीब जनतेची सेवा केली आहे. कराडला पाणीटंचाई निर्माण झाल्यावर डॉ. अतुलबाबा भोसले जनतेसाठी धावून आले. आता आपण त्यांना साथ देण्याची वेळ आली असल्याचे डॉ. सुरभी भोसले यांनी सांगितलं. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी लाडक्या बहिणींना, तसेच बांधकाम कामगारांना मोठा लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे अतुलबाबांना आपण भाऊबीजेची भेट म्हणून विधानसभेत पाठवूया, असे आवाहन रोहिणी शिंदे यांनी उपस्थित महिलांना केले. याप्रसंगी माजी जि. प. सदस्या श्यामबाला घोडके, शिवसेनेच्या सुलोचना पवार, डॉ. सारिका गावडे, कविता कचरे, प्रा. डॉ. स्नेहल राजहंस यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.