Download App

हंसराज अहिर यांनी जुनी जखम उघडी केली… टेन्शन सुधीर मुनगंटीवारांना!

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यानिमित्ताने प्रत्येक पक्षाची तयारी सुरू झाली आहे. ती सुरू असतानाच जुन्या जखमांवरची खपली निघू लागली आहे. महाराष्ट्रात भाजपला अशीच एक जखम झाली होती. ती पुन्हा ठसठसली. महायुतीच्या मेळाव्याच्या निमित्तानेच या जखमा होण्यासाठी कोणी वार केले याची चर्चा रंगली.  या ठसठसीची डोकेदुखी कोणाला, होणार याचीच चिंता अनेक नेत्यांना सतावते आहे. (Sudhir Mungantiwar Vs Hansraj Ahir)

तर हा किस्सा पूर्ण ऐकण्यासाठी आपल्याला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल पुन्हा नजरेखालून घालावे लागतील. भाजपने महाराष्ट्रात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत  २५ जागा लढविल्या. त्यापैकी २३ जागा मोठ्या फरकाने जिंकल्या. दोन ठिकाणी पराभव झाला. बारामतीत राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे या विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचा बारामती हा किल्ला होता. त्यामुळे येथील पराभवाचा भाजपला धक्का बसला नाही. पण चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. चार वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आणि पंतप्रधान मोदींच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री असलेल्या हंसराज अहिर यांना काॅंग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी अस्मान दाखवले. राज्यात काॅंग्रेसने लोकसभेची एकच जागा जिंकली. ती म्हणजे चंद्रपूरची.

Disqualification MLA : राजकीय संघर्ष संपला नाही; नार्वेकरांविरोधात ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव

हंसराज अहिर यांनी गाजलेला कोळसा घोटाळा बाहेर काढला होता. त्याचे बक्षीस मोदींनी त्यांना मंत्रिरुपाने दिले होते. भाजपची ग्रामपंचायतीपासून ते दिल्लीपर्यंत सत्ता होती. सुधीर मुनगंटीवार हे तेव्हा चंद्रपूरचे पालकमंत्री होते. चंद्रपुरात तेव्हा भाजपचा उमेदवार पराभूत होईल, अशी शक्यता कोणीच वर्तवली नव्हती. शिवसेनेचे आमदार असलेले धानोरकर हे मात्र आपल्या उमेदवारीसाठी आग्रही होते. शिवसेना आणि भाजपची तेव्हा युती होती. शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार नसल्याचे त्यांना माहीत होते. त्यासाठी त्यांची शिवसेनेचा त्याग करण्याची तयारी होती. काँग्रेस नेत्यांकडे आग्रह करून त्यांनी अखेरच्या दिवसांमध्ये उमेदवारी मिळवली आणि चमत्कार घडला. धानोरकर यांनी ५ लाख ५९ हजार मते मिळवली. अहिर यांना ५ लाख १४ हजार मते मिळाली. अहिर यांचा सुमारे ४५ हजार मतांच्या फरकाने पराभव झाला.

हा मतदारसंघ चंद्रपूर आणि यवतमाळ अशा दोन जिल्ह्यांत पसरला आहे. राजूरा, चंद्रपूर, बल्लापूर आणि वरोरा या चंद्रपूरमधील चार आणि वणी, अर्णी या यवतमाळमधील दोन विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश होतो. अहिर येतात चंद्रपूर जिल्ह्यातून. पण यवतमाळमधील दोन विधानसभा मतदारसंघात अहिर हे आघाडीवर राहिले. तर स्वतःच्या जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात ते पिछाडीवर राहिले. तेव्हा सुधीर मुनगंटीवार हेच चंद्रपूरचे पालकमंत्री होते. त्यांच्या स्वतःच्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातही अहिर यांना आघाडी मिळू शकली नव्हती. आपल पराभव कसा झाला, याचे गणित अहिर यांना अजून उलगडलेले नाही.

आपल्याच पक्षातील नेत्यांनी तर आपल्याविरोधात कट केला नाही ना, अशी शंका अहिर यांना वारंवार येते. हीच शंका त्यांनी पुन्हा बोलून दाखवली. त्याला निमित्त झाले ते महायुतीच्या संकल्प मेळाव्याचे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस यांचे संकल्प मेळावे राज्यभर झाले. याच मेळाव्यात अहिर यांनी ही खदखद व्यक्त केली.

Loksabha Election 2024 : इंडिया आघाडीला धक्का; लोकसभेसाठी मायावतींचा ‘एकला चलो रे’चा नारा

“जिल्ह्यात ग्रामपंचायत पासून तर पंचायत समितीपर्यंत, नगर परिषद, महापालिका पासून तर जिल्हा परिषद अशा सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची सत्ता होती. असे असताना माझा पराभव झालाच कसा?”, असा जळजळीत सवाल अहिर यांनी भाषणातून केला. या वेळी तीनही पक्षांचे ज्येष्ठ नेते व्यासपीठावर हजर होते. मोदी लाटेत महाराष्ट्रात भाजपला ही जागा जिंकता आली नाही. बुथवर गडबड झाली कशी असा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यांनी कोणाचे नाव घेतले नाही पण तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच त्यांचा इशारा कळला. व्यासपीठावर असलेल्या अनेक चेहऱ्यांचे नेते तेव्हा पाहण्यासारखे झाले होते.

य पराभवानंतर भाजपने अहिर यांना केंद्रिय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्षपद देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची मोठी राजकीय संधी या पराभवामुळे हुकली.

या पराभवाला अनेक जण सुधीर मुनगंटिवार यांना जबाबदार धरतात. मुनगंटिवार आणि अहिर यांच्यात सुप्त वाद आहे. त्याचाचा परिणाम या निवडणुकीत झाल्याचे बोलले जाते. स्वतः मुनगंटिवार मात्र हा आरोप नाकारतात. काॅंग्रेसच्या मतांचे विभाजन करण्यात आम्ही पडलो. त्यामुळे अहिर यांचा पराभव झाल्याचा दावा, मुनगंटिवार यांनी या विषयावर एकदा केला होता.

आता पाच वर्षांपूर्वी झालेल्या या निकालाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून मुनगंटिवार यांनाच येथून लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार असल्याचाही अंदाज आहे. स्वतः मुनगंटिवार यांची दिल्लीत जाण्याची इच्छा आहे की नाही, हे उघड झालेले नाही. पण चंद्रपुरात भाजप धक्कादायक निर्णय घेण्याची शक्यताही नाकारण्यात येत नाही.

दुसरीकडे काॅंग्रेसमध्ये येथील उमेदवारीवरून आताच स्पर्धा सुरू झाली आहे. बाळू धानोरकर यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यामुळे ही जागा रिक्तच आहे. पुण्याप्रमाणे तेथेही पोटनिवडणूक झालीच नाही. धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभ या आमदार आहेत. त्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याशिवाय इतर सात जणांनीही काॅंग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे.

एकूणच चंद्रपूरची निवडणूक अनेकांचे करिअर घडविणारी आणि बिघडविणारी होण्याची शक्यता आहे. मुनगंटिवार हा उमेदवारीचा बाॅल टोलवणार की त्यावर सावधगिरीने धावा काढणार, याची उत्सुकता आहे. दुसरीकडे अहिरांना आपला जुना हिशोब चुकता करायचा आहे. या साऱ्या परिस्थितीमुळे चंद्रपूरमधील जखमा भरून निघणार की त्या आणखी खोल होणार, हेच काही दिवसांत स्पष्ट होईल.

follow us

वेब स्टोरीज