मुंबई : भाजपसोडून राष्ट्रवादीशी घरोबा केलेल्या अन् आमदार झालेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी परत पक्षात यावं असं म्हणतं भाजपचे (BJP) नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीत विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी खडसेंना भाजप प्रवेशाचे निमंत्रण दिले आहे. मुंबई तकने आयोजित केलेल्या विशेष मुलाखतीमध्ये तावडे बोलत होते. भाजपाचे काही दुखावलेले, नाराज झालेले नेते वैयक्तितरित्या तुमच्याशी बोलतात का? एक राष्ट्रीय नेता म्हणून महाराष्ट्रकडे बघताना त्यावर काय तोडगा असावा असं तुम्हाला वाटतं? असा प्रश्न या मुलाखतीमध्ये तावडे यांना विचारण्यात आला होता. (BJP leader Vinod Tawade invite Eknath Khadse to join BJP again)
यावर बोलताना विनोद तावडे म्हणाले, ‘ज्या प्रकारे माझी मैत्री असते, संबंध असतात.. तर सगळ्या पक्षातील दु:खी हे माझ्याशी बोलतात. त्याला काही अडचण नसते. केवळ भाजपचेच नाही. कारण शेवटी आम्ही सगळे राजकीय क्षेत्रात काम करणारे आहोत. सगळे एकत्र प्रवास करतो. त्यामुळे सगळे बोलतात, आमच्या पक्षात असं आहे, तसं आहे. ते शेअरिंग असतं.
पण ज्याच्यावर अन्याय होत असतो, त्याच्याकडे पेशन्स असले पाहिले. उदाहरणार्थ विलासराव देशमुख. 1995 साली विधानपरिषदेला भाजपने मदत केलेली. शिवसेनेने मदत केली असती तर ते अँटी काँग्रेस म्हणून विधानपरिषदेवर निवडून आले असते, पण पडले. पण पुढे तेच विलासराव मुख्यमंत्री झाले.
एकनाथ खडसे यानी परत यावं असं तुम्हाला वाटतं का? यावर बोलताना तावडे म्हणाले, ‘मला असं वाटतं की, नाथाभाऊंनी आता परत आलं पाहिजे. पक्षात त्यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्याची आणि नेतृत्वाची गरज आहे. पण नाथाभाऊ ज्या स्पष्टपणे बोलतात तसं अपेक्षित नसेल. मात्र जी-जी माणसं पक्षात आली पाहिजे असं आम्हाला वाटतं त्यात नाथाभाऊ आहेत.’ असं म्हणत तावडेंनी एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये यावं पण शांत राहावं असं मत व्यक्त केलं.
एकनाथ खडसे जवळपास 4 दशकं भाजपमध्ये होते. 1995 आणि 2014 मध्ये भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये ते मंत्री देखील होते. मात्र कालांतराने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर 2019 मध्ये पक्षाने त्यांचं विधानसभेचं तिकीटही कापलं होतं. अखेरीस नाराज होत त्यांनी भाजपला राम-राम करत राष्ट्रवादीशी घरोबा केला. त्यानंतर ते विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले.