Download App

आठवले, जानकर, बच्चू कडू आणि सदाभाऊ यांची अवस्था कढिपत्त्यासारखी!

  • Written By: Last Updated:

(Loksabha Elction 2024) राजकीय कार्यकर्ता हा कढिपत्त्यासारखा असतो. उकळत्या तेलात सर्वात आधी कढिपत्त्याला टाकले जाते. खादयपदार्थ तळून तयार झाला की खाताना सर्वात आधी कढिपत्त्याला बाहेर काढले जाते. म्हणजे आधी हुतात्मा तोच होणार आणि कार्यभाग आटोपला की त्याचाच कार्यक्रम होणार.  कार्यकर्त्यांच ठिक आहे हो. पण राजकीय पक्षांचही असचं असतं! गरज सरो आणि मदत करणारा मरो, ही म्हण राजकारणात अगदी फिट्ट बसते. (Maharashtra Politics)

तसाच अनुभव महायुतीतील छोटे घटक पक्ष घेत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीच आपल्या राजकीय स्थितीचे वर्णन करताना स्वतःला कढिपत्त्याची उपमा दिली. एकट्या आठवले यांची ही स्थिती नाही. तर भाजपसोबत २०१४ पासून असलेल्या अनेक छोट्या पक्षांना असेच वाटते आहे. आठवले यांनी त्यांची ही अवस्था बरोबर सांगितली. प्रहारचे बच्चू कडू आणि रयत शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांची परिस्थिती वेगळी नाही. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनाही असाच अनुभव येत आहे. तरी या मंडळींनी अद्याप महायुती सोडण्याचा निर्णय घेतलेला नाही. फक्त त्यांची खदखद ते व्यक्त करत आहेत.

महाराष्ट्रात ४५ हून अधिक लोकसभेच्या जागा जिंकण्यासाठी महायुती कामाला लागली आहे. या निमित्ताने प्रत्येक जिल्ह्यात संकल्प मेळावे झाले. भाजपने आपल्या सोबत असलेल्य सर्व पक्षांच्या नेत्यांना या वेळी फ्लेक्सवर स्थान दिले. तेव्हाच भाजपसोबत इतके पक्ष असल्याची जाणीव त्यांच्या कार्यकर्त्यांना झाली. पण फक्त फ्लेक्सवर स्थान मिळणार की प्रत्यक्षात सत्तेत वाटा मिळणार, याची चिंता या नेत्यांना सतावते आहे.

भाजपचा सगळ्यात मोठा मित्रपक्ष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना. पण अजित पवार यांचा राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष या महायुतीत आल्याने इतर छोट्या पक्षांची गरज भाजपला वाटेनाशी झाली आहे.  या तीन मोठ्या पक्षांच्या जागावाटपाचा तिढा सुटण्यासाठी बऱ्याच काथ्याकूट होणार आहे. त्या या छोट्या पक्षांची दखल कोण घेणार?  मग हे मित्रपक्षही अधुनमधून नाराजी  व्यक्त करतात. या पक्षांची नाराजी काढण्यासाठी भाजपने प्रसाद लाड यांची खास नियुक्ती केली आहे. तरीही ही नाराजी उफाळून येते. कधीकधी सत्ताकारणाील दबाव तंत्राचा भाग म्हणूनही ह छोटे पक्ष आक्रमक होतात.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसशिवाय भाजपसोबत राज्यतील कोणते पक्ष आहेत हे तरी यानिमित्ताने पाहू. राज्यातील महायुतीत थोडेथिडके नाही तर भाजपसह चौदा पक्ष आहेत.

यातील पहिला पक्ष म्हणजे रिपब्लिकन पक्ष (आठवले गट). या पक्षाल भाजपने राज्यसभेची एक जागा दिली आहे. गेल्या दहा वर्षांपासून आठवले हे भाजपसोबत आहेत. भाजपने त्यांना केंद्रात राज्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली. दलित मतांची आकडेवारी जुळविण्यासाठी आठवलेंची भाजपला गरज आहे. आठवले देखील भाजपला सोडण्यच्या मनस्थितीत दिसत नाहीत. रिपब्लिकन नेत्या सुलेखा कुंभारे भाजपसोबत आहेत. नागपूरमध्य त्यांची महायुतीला मदत होऊ शकते. याशिवाय सचिन खरात यांचा रिपब्लिकन गट आधी अजित पवार यांच्यासोबत होता. तो आता महायुतीत आला आहे.

दुसरा मोठा पक्ष म्हणजे महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे जानकर हे भाजपसोबत आले. सुरवातीच्या काळात जानकर यांना महत्वाचे स्थान भाजपने दिले. त्यांना राज्यात कॅबिनेट मंत्रीपद दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांत त्यांच्या कार्यकर्त्यांना संधी दिली. पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने चलाखी केली. राष्ट्रीय समाज पक्षाला दौंड आणि गंगाखेड हे दोन विधानसभा मतदारसंघ सोडण्यात आले. पण दौंडमधून राहुल कुल यांनी ऐनवेळी भाजपचे कमळ चिन्ह घेतल. त्यामुळे रासपची अधिकृत एक जागा कमी झाली. गंगाखेडचे रत्नाकर गुट्टे हे रासपचे आमदार म्हणून ओळख सांगतात. खुद्द जानकर यांची महायुतीत राहावे की महाविकास आघाडीत जावे, अशा संभ्रमात आहेत.

आपला पक्ष त्यांना मोठा करायचा आहे. पण त्यासाठी कोणत्या तरी आघाडीत गेल्याशिवाय त्यांना पर्याय नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप त्यांना कोणत्या मतदारसंघातून संधी देणार, यावर त्यांचा निर्णय ठरेल. जानकर यांना परभणी मतदारसंघ हवा आहे. भाजपने मात्र त्यांना अद्याप ग्रीन सिग्नल दिलेला नाही.

भाजपसोबत असलेल आणखी एक नेते म्हणजे सदाभाऊ खोत. फडणवीस सरकारच्या काळात खोत राज्यमंत्री झाले. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना फुटली. खोत आणि राजू शेट्टी यांचीही जोडी तुटली. खोतांनी रयत शेतकरी संघटना म्हणून भाजपशी घरोबा कायम ठेवला. मंत्रीपद दूरच पण त्यांना विधान परिषदेवर पुन्हा संधी मिळू शकली नाही. त्यांना हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. पण या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेच रस्सीखेच असल्याने खोतांनाही हात चोळत बसावे लागणार आहे.

प्रहारचे बच्चू कडू हे महायुतीत आहेत. पण ते सध्या फटकून वागत आहेत. महायुतीने ठेवलेल्या संकल्प मेळाव्याला त्यांची गैरहजेरी होती. गैरहजर राहण्याचा निर्णय जाहीर करताना त्यांनी छोट्या पक्षांना गृहित धरू नका, असा इशाराही त्यांनी देऊन टाकला. विनायक मेटे यांनी स्थापन केलेल्या शिवसंग्राम संघटनेला भाजपने सोबत घेतले आहे. मेटे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ज्योतीताई संघटनेची धुरा सांभाळत आहेत. त्यांचाही फोटो महायुतीच्या फ्लेक्सवर झळकताना दिसू लागला आहे. याशिवाय जनसुराज्य पार्टीचे नेते आणि माजी मंत्री विनय कोरे यांनाही महायुतीत स्थान मिळाल आहे. त्यांचा कोल्हापूरमध्य भाजपला उपयोग होऊ शकतो. याशिवाय वसई पट्ट्यावर वर्चस्व असलेली बहुजन विकास आघाडी आज महायुतीसोबत आहे. या आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांचाही फोटो महायुतीच्या फ्लेक्सवर आहे.

या प्रत्येक पक्षाची, संघटनांची जिल्हानिहाय थोडीफार ताकद आहे. पण त्यांना जागावाटपात स्थान कसे द्यायचे, हा मोठा प्रश्नच आहे. रामदास आठवले, राजू शेट्टी, महादेव जानकर हे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रभावामुळे भाजपसोबत २०१४ मध्ये आले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची देशात सत्ता आली. तेव्ह भाजप आणि शिवसेना यांची युती होती. विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपच्या विरोधात गेली. त्यामुळे या घटक पक्षांना भाजपने महत्व दिले. यातील काही नेत्यांना सत्तेची ऊबही मिळाली. आता सत्तेतील प्रमुख वाटेकरीच वाढले आहेत. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना सोबत आहे. अजित पवार यांच्याशी बेरीज भाजपने केली आहे. भाजपला राज्यात ४५ टक्क्यांहून अधिक मते घ्यायची आहेत. त्यात भाजपची स्वतःची २५ ते ३० टक्के मते आहेत. शिंदे यांच्यामुळे १२ ते १५ टक्क्यांपर्य़ंतची वाढीव मते मिळू शकतात. या दोघांची युती झाली तरी या तुलनेत महाविकास आघाडीकडे मतांची टक्केवारी जास्त दिसत होती. उद्धव ठाकरेंची शिवसेना, संपूर्ण राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस या तिघांच्या पराभवासाठी एकट्या शिंदेंची साथ पुरशी नाही. ह लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादीचे दोन तुकडे करून भाजपने अजित पवारांना महायुतीत घेतले. त्यामुळे महायुतीची टक्केवारी ५० पर्यंत जाण्याचा विश्वास भाजपला वाटतो आहे.

म्हणूनच महायुतीतील घटक पक्षांची अवस्था रामदास आठवले म्हणतात त्याप्रमाणे कढिपत्त्यासारखी झाली आहे.

 

 

follow us