राज्यात भाजपची हॅट्ट्रिक; नगरपालिका, महानगरपालिकेनंतर आता जिल्हा परिषदेवर देखील वर्चस्व

भाजपने 230 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही लक्षणीय यश मिळवलं आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 12

BJP is also dominant in the Zilla Parishad : महापालिकेनंतर जिल्हा परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतही भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. भाजपने या निवडणुकांमध्ये 230 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला आहे. भाजपनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही लक्षणीय यश मिळवलं आहे. मात्र, महाविकास आघाडीला या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.

निकाल जाहीर होऊ लागल्यानंतर राज्यभरात भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोषाला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे, पक्षाचे वरिष्ठ नेते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. दरम्यान, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत निवडणूक निकालांबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विधानसभा, नगरपरिषद, महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतील निकाल हे भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या समर्पणाची साक्ष असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या सर्व निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीने अभूतपूर्व यश मिळवल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

आपल्या पोस्टमध्ये बावनकुळे म्हणतात, “भाजपा का कार्यकर्ता, कभी हारता नही है। वो जितता है, या फिर सीखता है,” हे श्रद्धेय अटलजींचं अजरामर विधान आजच्या निकालांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. 150 ठिकाणी नगराध्यक्ष, 25 ठिकाणी महापौर आणि आता जिल्हा परिषदेत आठ ठिकाणी महायुतीने विजय मिळवत विविधतेतून एकतेचा संदेश दिला असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

 

पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता या निवडणुकीत विजयासाठी प्रामाणिकपणे झटत होता. सुमारे 51 टक्के मतं भाजपाच्या पारड्यात पडल्याचं दिसून येत असून, हे यश पूर्णतः कार्यकर्त्यांचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानत, विजयी उमेदवारांचे त्यांनी हार्दिक अभिनंदन केलं आहे. तसंच, “पंचायत ते पार्लमेंट हा केवळ नारा नसून, तो इच्छाशक्तीचं प्रतीक आहे,” असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ध्रुवनेतृत्वाचं आणि मार्गदर्शनाचं कौतुक बावनकुळे यांनी केलं आहे.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रोत्साहनामुळेच हे यश शक्य झाल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. हा विजय महाराष्ट्रातील जनतेने दिलेला सकारात्मक कौल असून, विकसित महाराष्ट्राच्या दिशेने ग्रामीण जनतेने दिलेली ही भक्कम साथ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शेवटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह सर्व पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत, जनतेचे मनापासून आभार मानत त्यांनी आपल्या पोस्टचा शेवट “जय महाराष्ट्र” या घोषणेसह केला आहे.

follow us