Download App

Chandrashekhar Bawankule : ‘युती तोडण्याचं कारस्थान केलं, त्याचंच हे फळ’; बावनकुळेंनी राऊतांना सुनावलं

Chandrashekhar Bawankule replies Sanjay Raut : भाजपने काल देवेंद्र फडणवीस यांचा मी पुन्हा येईनचा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.  भाजपने आता हा व्हिडिओ डिलीट केला असला तरी विरोधकांनी त्यावर शिंदे आणि अजित पवार यांची कोंडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही फडणवीस पुन्हा येत असतील तर त्यांचे स्वागतच करू, असा खोचक टोला लगावला होता. या सगळ्या घडामोडींनंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी त्यावर भाष्य केले आहे. बावनकुळे आज भिवंडी शहरात आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारले.

मोदींची टीका त्यांना झोंबली, आता निवडणुकीत कळेलच! बावनकुळेंचा पवारांना इशारा

बावनकुळे म्हणाले, 2019 मध्ये तुम्ही का खंजीर खुपसला? देवेंद्रजींच्या सरकारला बहुमत मिळालं होतं. 165 पेक्षा जास्त आमदारांचं समर्थन मिळालेलं होतं. देवेंद्रजीच मुख्यमंत्री व्हावेत अशी राज्यातील तेरा कोटी लोकांची इच्छा होती. तेव्हा तुम्ही शरद पवार, राहुल गांधींना सोबत घेऊन हिंदुत्वाचा विचार सोडून, फडणवीस मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून, पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून, युती तोडून जे कट कारस्थान केलं त्याचच हे फळ आहे. इथलं इथच भरावं लागतं. आज काय परिस्थिती आहे उद्धव ठाकरेंना रोज लोक सोडून जात आहेत. आमच्याकडे रोज काँग्रेसचे लोक येत आहेत. आता निवडणुका जवळ येतील तसे मोदींचं वादळ येईल आणि हे वादळ राज्यातील इंडी आघाडीला साफ केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.

मुख्यमंत्री कोण, बावनकुळे म्हणाले…  

भाजपाचा कार्यकर्ता भेटतो तेव्हा तो म्हणतो की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत. शिवेसेनेचा कार्यकर्ता भेटतो तेव्हा तो म्हणतो की एकनाथ शिंद मुख्यमंत्री व्हावेत. अजितदादांचा कार्यकर्ता म्हणतो की अजितदादा मु्ख्यमंत्री व्हावेत. ते काही चुकीचं नाही. काँग्रेस पक्षात तर आतापर्यंत पंधरा मुख्यमंत्री तयार झाले आहेत. आता तर वडेट्टीवारही विदर्भात मुख्यमंत्रीपदाचे बोर्ड लावतात. शरद पवार गटातही दोन-तीन मुख्यमंत्री तयार झालेत. उद्धव ठाकरे गटात स्वतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आहेत. पण, आमच्यावर तसे संस्कार नाहीत. पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत ही भावना आहे बाकी काही नाही, अशा शब्दांत उत्तर देत त्यांनी 2024 पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील असे सांगितले.

“पंतप्रधान पद प्रतिष्ठेचे, नीट माहिती द्या” : 10 वर्षांच्या कामांचा पाढा वाचत पवारांचा PM मोदींवर पलटवार

काय म्हणाले होते संजय राऊत ?

त्यांच्या मी पुन्हा येईलचं आम्ही सध्या स्वागत करतो. कारण ते कायदेशीर सरकार असेल आम्ही कायदा आणि घटना मानणारी लोकं आहोत. जर ते कायदेशीर आणि घटनात्मक मार्गाने येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू. या राज्यात बेकायदेशीर मुख्यमंत्री बसलेले आहेत. तेच बेकायदेशीर आदेश पोलीस आणि यंत्रणा पाळते आहे. हे अत्यंत चुकीच आहे. एक तात्पुरती व्यवस्था म्हणून कायदेशीर मुख्यमंत्री येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत नक्कीच करू. देवेंद्र फडणवीस यांची मला दया येते. सातत्याने गेल्या पाच वर्षापासून मी पुन्हा येईन, असं सांगत आहेत. पण त्यांना पुन्हा घ्यायची संधी मिळत नाही. फौजदाराचा हवालदार केला जातो आणि त्यांना आणलं जातं. एक बेकायदेशीर मुख्यमंत्री त्यांच्या छातीवर बसवले जातात, अशी टीका राऊत यांनी केली.

Tags

follow us