पुणे : काही दिवसांपूर्वी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटले होते. यावरुन चंद्रकांत पाटील यांना माफी देखील मागावी लागली होती. आता पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
आपला कुठलाच देव बॅचलर नाही, महापुरूषही बॅचलर नाही असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. पुण्यात राष्ट्रीय युवा दिनाच्या कार्यक्रमात पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.
आपला कुठलाही देव बॅचलर नाही आपले कुठलेही महापुरूष बॅचलर नाहीत. संसार करून सगळं करता येतं. सेवाही करता येते. जगात असा कुठलाही माणूस नाही ज्याचं रक्त हिरवं किंवा निळं आहे. देवाने माणसाला घडवताना कुठलाही भेद केला नाही.
सगळ्यांना सारखंच बनवून पाठवलं. इंग्रज आले आणि आपली संस्कृती बदली. आईला मम्मी आणि वडिलांना पप्पा म्हणायाला लागलो. आपली संस्कृती विसरलो, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
हिंदू हा एक विचार आहे. तुम्हाला कुठल्याही मंदिरात जाण्यापासून हिंदू धर्म अडवत नाही. हिंदू हा शब्द पूजेशी जोडला गेलेला नाही. हिंदू हा गुणवाचक शब्द आहे. आपल्या देशावर कितीतरी आक्रमणं झाली, मुस्लिम, इंग्रज, डच आले काय फरक पडला? आपला धर्म बुडाला का? असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
छत्रपती संभाजी महाराज यांचेही हाल करण्यात आले. मात्र छत्रपती संभाजी महाराजांनीही आपला धर्म सोडला नाही. त्यांच्यावर किती अत्याचार झाले तरीही त्यांनी धर्म सोडला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपला धर्म वाचवला आणि जगवलाही. नाहीतर सगळ्यांची सुंता झाली असती असंही वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं.