Chandrasekhar Bawankule : गेल्या काही दिवासांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. रविवारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या समर्थक आमदारांसोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेत. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यानंतर राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवारांना मुख्यमंत्री केले जाणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत. या सगळ्या चर्चांना आता भाजपचे प्रदेशाध्यचक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrasekhar Bawankule) पूर्णविराम दिला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच 2024 पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. (Chandrasekhar Bawankule Says Eknath Shinde will remain Chief Minister till 2024)
चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, राज्य सरकारचा कारभार एकदम सुरळीत सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात कोणतीही अस्वस्थता नाही. यापूर्वी आम्हीही विरोधी पक्षात होतो, विरोधी पक्षातून सरकारमध्ये आलो आहोत. का आलो, तर एकनाथ शिंदे आमच्या पूर्वीच्या भाजप-शिवसेनेच्या नैसर्गिक युतीत आले. महायुतीत सहभागी झाल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले. राज्याच्या भल्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एक पाऊल मागे घेत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले.
गडकरींचा दावा, पेट्रोल होणार 15 रुपये प्रतिलिटर, शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालणार गाड्या
ते म्हणाले, आता त्यात काही किंतू-परंतू करण्याची गरज नाही. राज्य अगदी सुरळीत चालू आहे. एकनाथ शिंदे 2024 पर्यंत मुख्यमंत्री राहतील. मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्न येतोच कुठे? मुख्यमंत्री बदलणार ह्या कल्पोकल्पित गोष्टी आहेत. विरोधक केवळ लोकांमध्चे संभ्रम निर्माण कऱण्याचा प्रयत्न करत आहे. मी जबाबदारीने सांगत आहे की, एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि तेच 2024 पर्यंत मुख्यमंत्री राहतील. शिंदे गटात कोणतीही अस्वस्थता नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
अजित पवारांनी महायुतीत एंट्री केल्यानंतर शिंदे गटाची धाकधुक वाढली. वर्षभर मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहूनही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. मात्र, NCP च्या आमदारांना मंत्रिपदे मिळाली. त्यामुळं शिंदे गटातील आमदार नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या. इतकचं नाही, तर सीएम शिंदेंचं मुख्यमंत्रीपदही जाणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, आता बावनकुळेंनी सीएम शिंदे हेच 2024 पर्यंत मुख्यमंत्री राहणार असल्याचं सांगितलं. तरीही राजकारणात कधीच कोणी कायमचा मित्र नसतो, आणि शत्रू नसतो. त्यामुळं आता पुढं काय होतं, हेच पाहणं महत्वाचं आहे.