प्रफुल्ल साळुंखे,विशेष प्रतिनिधी
Chitra Wagh BJP leader : गेल्या काही वर्षांपासून भाजपची बाजू जोरकसपणे मांडणाऱ्या, भाजपची ढाल होऊन विरोधकांच्या टीकेला जशास तसं उत्तर देणाऱ्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आता पक्षात एकाकी पडल्या आहेत का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. चित्रा वाघांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना अशा सर्वांशी पंगा घेतला आहे. संजय राऊत आणि शिवसेनेच्या नेत्यांशी सुरु असलेला संघर्ष कायम चर्चेत असतो. अशा संघर्ष करणाऱ्या चित्रा वाघांना पुण्यात झालेल्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत सन्मानाने व्यासपीठावर बसवायला हवे होते असा सूर उमटत आहे.
नुकतीच भाजपची राज्य कार्यकारिणी समितीची पुण्यात बैठक संपन्न झाली. या बैठकीत व्यासपीठावर कोणी बसावं, यासाठी चांगलीच खलबत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुरवातीला व्यासपीठावर चार खुर्च्या लागतील असा निर्णय झाल्याची माहिती आहे. या चार खुर्च्यावरून मानापमान नाट्य रंगण्याची भीती होती. त्यामुळे एक नाव वाढलं की एक खुर्ची वाढवण्यात आली. असं करत व्यासपीठवर दहा ते बारा नेत्यांची नावे वाढली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जर ही नावं वाढली तर महिला अध्यक्ष या नात्याने चित्रा वाघ यांना देखील सन्मान मिळायला हवा होता अशी चर्चा रंगली आहे.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर वाघ यांनी आपला मूळ बाणा सोडलेला नाही. वाघ यांच्या आक्रमकतेपुढे महाविकास आघाडी सरकारला झुकावे लागले, त्याचे चित्र संपूर्ण राज्याने पाहिले आहे.
खरंतर एक संघर्षशी आणि अभ्यासू नेत्या म्हणून चित्रा वाघ यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओळख होती. महिला सुरक्षा,महिला सक्षमीकरण आणि सक्षमीकरणाबाबत कणखर आणि तितकीच आक्रमक भूमिका घेणाऱ्या चित्रा वाघ यांचे सर्व नेत्यांशी सलोख्याचे संबंध होते. संघर्ष करण्याची तयारी, महिलांचे संघटन आणि त्यासाठी राज्यभर दौरे करण्याची तयारी यामुळे चित्रा वाघ राष्ट्रवादीच्या दुसऱ्या क्रमांकाच्या फळीत आल्या होत्या. त्यांना महिला आघाडीच्या प्रदेशाध्याची जबाबदारी देखील देण्यात आली होती. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दरम्यान, अनेक नेते भाजपमध्ये जात असताना चित्रा वाघ यांनी देखील हाती कमळ घेतले.
‘भाजपच्या सत्तेची चिमणीही लवकरच’.. ‘त्या’ वक्तव्यावरून वडेट्टीवारांचा फडणवीसांना खोचक टोला
चित्रा वाघ भाजपत आल्यानंतर महिला भाजपमध्ये त्यांचं नाखुशीनेच स्वागत झालं. माजी अध्यक्ष उमा खापरे त्याचबरोबर माजी अध्यक्ष नाईक यांनी चित्रा वाघ यांच्याशी कायम अंतर राखलं. अशा परिस्थितीतही संघटन, विविध विषयांची हाताळणी आणि राज्यभर पोलीस दलातील खबऱ्यांचे जाळे यामुळे अनेक विषय चित्रा वाघ यांच्या जवळ सर्वात जलदगतीने आले. त्यावर त्यांनी संघर्ष देखील उभा केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला अत्याचारावरून सरकारची लक्तरं काढली. सोशल मीडियावर देखील खूप ऍक्टीव्ह असणाऱ्या नेत्यांमध्ये चित्रा वाघ यांचा नंबर वरचा आहे.
गेली पाच वर्ष चित्रा वाघ भाजपातील महिला मोर्चात संघर्ष करुन स्वतःच स्थान निर्माण करत आहेत. अशा परिस्थितीत विधान परिषदेसाठी दोन वेळा दावा असताना त्यांना बाजुला ठेवण्यात आले. आता चित्रा वाघ प्रदेश अध्यक्ष आहेत. असं असूनही भाजपमधील महिलांचे तीन ते चार गट चित्रा वाघ यांच्याशी अंतर ठेऊन आहेत. अशा परिस्थितीत ही चित्रा वाघ यांनी त्यांच संघटन मजबूत केलं आहे.
पक्षात आल्यावर महाआघाडी बरोबर संघर्ष करत असताना त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले. उमा खापरे यांची आमदारपदी वर्णी लागल्यावर चित्रा वाघ यांना महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी बसवण्यात आले. मात्र, हे खरे असले तरी राज्यात संघटन करताना पक्षात महिला अध्यक्षाला किती मान असतो, हा चिंतनाचा विषयाचा आहे. महिलांना राजकीय पक्षांत दुय्यम वागणूक मिळते की काय, असा प्रश्न उपस्थित होतो. मंत्रिमंडळात देखील एकाही महिलेला स्थान नाही. हाच मुद्दा उध्दव ठाकरे गट आणि राष्ट्रवादीकडून पुन्हा पुन्हा उपस्थित केला जातो.