Tanaji Sawant Controversial Statement: आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. या मैदानावर बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयींना गर्दी जमवता आली नाही, तिथं सावंतांनी ७ लाखांची गर्दी जमवून दाखवली, असं तानाजी सावंत एका कार्यक्रमात म्हणाले आहेत.
मोठेपणाच्या ओघात आरोग्यमंत्री हे वक्तव्य बोलून गेले आहेत, तरी त्यांना स्वकीयांच्याच रोषाला सामोरं जावं लागणार हे स्पष्ट आहे. कारण बाळासाहेब ठाकरे आणि वाजपेयी यांच्यापेक्षा आपण किती मोठे आहोत, हे तानाजी सावंतांनी एका वाक्यात सुचवण्याचा प्रयत्न केला. यामुळे एकीकडे शिवसेना (Shiv Sena) तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह संपूर्ण भाजपचा रोष त्यांनी ओढावून घेतला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली.
नेमकं काय म्हणाले तानाजी सावंत
ज्या ठिकाणी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सभेला गर्दी जमवता आली नाही, त्याच पंढरपूरमध्ये या तानाजी सावंतांनी ७ लाखांचा मेळावा घेण्याची कमाल घडवून आणली असे मोठं वक्तव्य एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले. यावरून सावंत बंधू या नेत्यांपेक्षा किंवा भाजप, शिवसेनेपेक्षा कसे मोठे आहेत? हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान या कार्यक्रमामध्ये हे सर्व सांगत असताना आरोग्यमंत्र्यांनी धडधडीत खोटी माहिती देत सर्वांची फसवणूक देखील केली.
स्वर्गीय शिवसेनाप्रमुख हे एकदाच १९९० मध्ये पंढरपूरला आले होते, आणि त्यांनी त्यांची विराट सभा रेल्वे मैदानावर घेतली होती. ही सभा इतकी मोठी झाली की, त्या सभेनं अगोदरचे सर्व विक्रम मोडून काढले होते. यांनतर स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याविषयी तानाजी सावंत सांगतात त्या नवीन स्टँडच्या मैदानावर धनगर मेळावा घेतला होता आणि हा मेळावा देखील विराट झाला होता.
आरोग्यमंत्री ज्या २०१७-२०१८ च्या शिवसेना मेळाव्याविषयी सांगतात तो मेळावा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रामधील शिवसैनिकांचा झाला होता. या मेळाव्याकरिता संपूर्ण राज्यभरातून हजारोंच्या संख्येने शिवसैनिक सोलापुरात जमले होते. आरोग्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात होणार असल्याने तानाजी सावंत हे पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे अडचणीत येणार आहेत, आता तर त्यांना स्वकीयांच्याच रोषाला सामोरं जावं लागणार असल्याचं स्पष्टच दिसत आहे.