Download App

सोनिया गांधींचे खासदार प्रतिनीधी ते अमेठीतून काँग्रेस उमेदवार! कोण आहेत के.एल. शर्मा

अमेठी मतदारसंघातून काँग्रेसने किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. शर्मा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

K.L. Sharma : लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदारसंघातून काँग्रेसने किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. शर्मा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. (Amethi Lok sabha) याआधी ते रायबरेली लोकसभा मतदारसंघात खासदार प्रतिनिधी म्हणून जबाबदारी सांभाळत होते. शर्मा हे सोनिया गांधी यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात.

 

खासदार प्रतिनिधी म्हणून जबाबदारी

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान, काँग्रेसने मोठ्या सस्पेन्सनंतर अमेठीच्या जागेवर किशोरीलाल शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. शर्मा यांना गांधी घराण्याच्या पारंपरिक जागेवरून उमेदवारी मिळाली आहे. शर्मा यांची ही पहिलीच निवडणूक असेल. आतापर्यंत ते रायबरेलीचे खासदार प्रतिनिधी म्हणून जबाबदारी सांभाळत होते. शर्मा हे सोनिया गांधी यांच्या जवळचे मानले जातात.

 

कोण आहेत केएल शर्मा

केएल शर्मा यांचे पूर्ण नाव किशोरी लाल शर्मा असून ते गांधी घराण्याच्या जवळचे मानले जातात. शर्मा हे मूळचे पंजाबमधील लुधियाना येथील रहिवासी आहेत. शर्मा 1983 मध्ये राजीव गांधींसोबत रायबरेली आणि अमेठीत दाखल झाले होते. पुढे, राजीव गांधींच्या आकस्मिक निधनानंतर, त्यांचे गांधी घराण्याशी असलेले संबंध कौटुंबिक बनले आणि ते गांधी कुटुंबाचा एक भाग बनून राहिले.

 

रायबरेली आणि अमेठीमध्ये सक्रिय

1991 मध्ये राजीव गांधी यांच्या निधनानंतर शर्मा यांनी कधी शीला कौल यांचे काम हाती घेतले तर कधी सतीश शर्मा यांना मदत केली. अशा परिस्थितीत शर्मा वारंवार रायबरेली आणि अमेठीला भेट देत राहिले. मात्र, जेव्हा सोनिया गांधींनी पहिल्यांदा सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि अमेठीतून निवडणूक लढवली तेव्हा केएल शर्मा त्यांच्यासोबत अमेठीत आले. जेव्हा सोनिया गांधींनी राहुल गांधींसाठी अमेठीची जागा सोडली आणि त्या स्वतः रायबरेलीला आल्या तेव्हा केएल शर्मा यांनी रायबरेली आणि अमेठी या दोन्ही जागांची जबाबदारी सांभाळली आहे.

 

निष्ठा आणि विश्वासूपणासाठी ओळखले जातात

राजीव गांधी, पुढे सोनिया गाधी मग राहुल गांधी असा मोठा काळ गेला. या कालावधीमध्ये शर्मा यांनी रायबरेली आणि अमेठी या दोन्ही भागातील संसदीय कामकाज पाहील आहे. या काळात अनेक काँग्रेसच्या लोकांनी पक्षाला सोडले. मात्र, केएल शर्मा यांची निष्टा पक्की राहीली ती काँग्रेस आणि गांधी कुटुंबाशी. केएल शर्मा बिहारचे प्रभारी होते. कधी पंजाब कमिटीचे सदस्य झाले तर कधी आयसीसीचे सदस्यही राहीले आहेत.

 

आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आज रायबरेली आणि अमेठीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. काँग्रेसने केएल शर्मा यांना अमेठीमधून उमेदवार घोषित केलं आहे. तर राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेस आज दोन्ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

follow us