Vijay Wadettiwar : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. त्याची तयारी राजकारणी मंडळींनी सुरू केली आहे. दुसरीकडे आमदार अपात्रता प्रकरणी 10 जानेवारीला निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यातच आता सत्ताधारी गटातील आमदार बच्चू कडू यांनी महायुतीबाबत विधान करून खळबळ उडवून दिली. मुख्यमंत्री बदलले तर महायुती सोडण्याचा विचार करू असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. पुढल्या दहा तारखेनंतर नवीन नवरदेव महाराष्ट्राच्या गादीवर बसण्यासाठी बाशिंग बांधून तयार आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर मत व्यक्त केले.
‘तरीही मराठ्यांना OBC मधून आरक्षण शक्य नाही’ विजय वडेट्टीवारांनी ठणकावूनच सांगितलं
वडेट्टीवार पुढे म्हणाले, बच्चू कडू काय म्हणतात ते पुढल्या काळात ठरेल. ते चांगले मंत्री होते. पण, तिकडे (शिंदे गट) गेले. त्यामुळे तेही गेलं (मंत्रीपद) अन् हेही गेलं. आता जर त्यांची महाविकास आघाडीत येण्याची तयारी असेल तर आम्ही काही दिवसांत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत यावर नक्कीच चर्चा करू. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही याबाबत माहिती देऊ. बच्चू कडूंची तयारी असेल तर त्यांच्याशी चर्चा करू असे वडेट्टीवार म्हणाले.
दहा जानेवारीला मुख्यमंत्री बदलाची चर्चा आता जोरात सुरू झाली आहे. याबद्दल विचारले असता वडेट्टीवार म्हणाले, पुढल्या दहा तारखेनंतर नवीन नवरदेव महाराष्ट्राच्या गादीवर बसण्यासाठी बाशिंग बांधून तयार आहे अशी माहिती आमच्याकडे आहे. आता हा नवरदेव कोण असणार हे दहा तारखेनंतच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. त्यामुळे कदाचित बच्चू कडूंनाही अंदाज आला असेल की आता मंडप बदलतोय आणि नवरदेवही बदलतोय, असे वडेट्टीवार म्हणाले.
ललित पाटीलवर सरकारचाच आशिर्वाद; विजय वडेट्टीवार यांचे पुणे, नाशिक पोलिसांवर गंभीर आरोप
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनंतर अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदी संधी मिळेल का, असा प्रश्न विचारला असता वडेट्टीवार म्हणाले, मुख्यमंत्रिपदासाठी अनेक जण बाशिंग बांधून तयार आहेत असे मोजकेच उत्तर दिले. दरम्यान, आमदार अपात्रता प्रकरणात निर्णय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दहा जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. आता या मुदतीत अध्यक्षांना निर्णय द्यावाच लागणार आहे. आमदार अपात्रच होतील असा दावा विरोधकांनी केला आहे.