Download App

कॅबिनेटला दांडी, प्रमुख नेतेही देवगिरीवर; नेमकी अजितदादांचे काय बिघडले ?

  • Written By: Last Updated:

मुंबई-प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे अचानक गायब होतात. त्यातून अनेक राजकीय चर्चा सुरू होतात. अजित पवार हे गायब झाल्यानंतर ते नाराज असल्याचे पुढे येते आणि त्याची कारणेही आहेत. आज पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे चर्चेत आले आहेत. आज मंत्रिमंडळ बैठक होती. या बैठकीला अजित पवार हे गैरहजर होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे दिल्लीला गेले. तर अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर अजित पवार गटाचे सर्व प्रमुख नेते आणि आमदार जमले आहेत. त्यामुळे अजित पवारांचे नेमकी काय बिघडले असा प्रश्न पडू लागला आहे.


‘आता तुम्ही गप्प बसा’; शरद पवारांच्या ‘त्या’ मागणीवर जरागेंचं रोखठोक भाष्य

या सर्व राजकीय चर्चा सुरू असताना अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांनी सर्व चर्चा फेटाळल्या आहेत. अजित पवार हे आजारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. खरे तर अजित पवार गट हा सत्तेत सहभागी झाला. अजित पवार हे मुख्यमंत्री होतील अशी सर्वांना अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. एव्हाना राष्ट्रवादीच्या वाट्याला अपेक्षित असलेली खाती देखील मिळाली नसल्याने ही नाराजी असल्याचे बोलले जात आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर पालकमंत्रिपदाबाबत राष्ट्रवादी आग्रही होती. त्यात पुणे सातारा आणि रायगड या तीन जिल्ह्यांचा आग्रह राष्ट्रवादी कडून होता. १५ ऑगस्टला ध्वजारोहणाची जबाबदारी देताना या तिन्ही जिल्ह्यांची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळली. पुण्यात चंद्रकांत पाटील , साताऱ्यात मुख्यमंत्री समर्थक शंभूराजे देसाई आणि रायगडसाठी शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांना मुख्यमंत्री यांनी झुकते माप दिले. यातून पहिली ठिणगी पडल्याचे बोलले जाते. त्यांनतर शिवसेना आमदार आणि मंत्री यांनी निधी मिळत नसल्याच्या तक्रारींना पुन्हा वाचा फोडली. सेना-राष्ट्रवादी वाद वाढत गेला.

निवडणुकांचं बिगुल वाजलं! राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी होणार मतदान…

मुंबई शहरात अमित शाह आले. त्यावेळी अजित पवार गैरहजर राहिल्याने दादा नाराज असल्याच्या बातम्यासमोर आल्या. माझे कार्यक्रम पूर्वनियोजित असल्याने आपण दौऱ्यात गेलो नाही असा अजित पवार यांनी खुलासा केला. याच दरम्यान अजित पवार हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गणपती दर्शनाला गेले. पण त्याच वेळी ते वर्षा बंगल्यावर गेले नाहीत. त्यावेळी देखील पवार-शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चा चांगल्याच रंगल्या. आज मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार गैरहजर होते. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले. त्यावेळी अजित पवार हे मुंबईत होते.

पक्षाच्या नेत्यांची दर मंगळवारी अजित पवार यांच्या घरी बैठक असते. या बैठकीला प्रमुख नेते आले पण आमदाराची ऊस्थितीती तुरळक होती. त्यावेळी देखील काही राजकीय भूकंप होतो का ? याकडे लक्ष वेधले गेले. या सर्व घडामोडीवर अजित पवार आजारी असल्याने दिवसभर ते सर्वच कार्यक्रमाला गैरहजर होते असा खुलासा सुनील तटकरे यांनी केला आहे. आता मुख्यमंत्री दिल्लीहून परत आल्यांनतर अजितदादांच्या गैरहजेरीचे कारण नक्की होणार हे नक्की.

Tags

follow us