अजितदादांचे इजा, बिजा, तिजा… : नाराजी लक्षात येताच शिंदे-फडणवीस दिल्लीला रवाना
मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) दोन जुन्या वादांनी पुन्हा डोकं वर काढलं आहे की काय असे सध्या वातावरण राजकीय वर्तुळात दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली. त्यानंतर सर्व मंत्रिमंडळ, सिनेसृष्टीतील दिग्गजांनी वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. मात्र इथेही जाणे अजितदादांनी टाळले. या दोन अनुपस्थितीची चर्चा होत असतानाच अजितदादांनी आज कॅबिनेट बैठकीला दांडी मारली. विशेष म्हणजे मंत्रालयात असूनही त्यांनी बैठकीला जाण्याचे टाळल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. (Ajit Pawar’s displeasure is due to funds and re-allocation of guardian minister ship)
या कॅबिनेट बैठकीआधी आणि नंतर घडलेल्या घडामोडीही राजकीय वर्तुळात चर्चा होण्यासारख्या आहेत. कॅबिनेटच्या आधी अजितदादांच्या गटातील मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तर बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या या दिल्ली दौऱ्याचा उल्लेख आजच्या दैनंदिन कार्यक्रमामध्ये नव्हता. म्हणजेच हा दौरा अचानक ठरला. तिकडे शिंदे-फडणवीस दिल्लीला जाताच इकडे अजितदादांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीतील सर्व मंत्री आणि नेते दाखल झाले. बंद दाराआड बैठकही झाली. एकूणच या सर्व घडामोडी पाहता अजित पवार शिंदे सरकारमध्ये नाराज आहेत, अशा निष्कर्षापर्यंत राजकीय तज्ञ येऊन पोहचले आहेत.
Letsupp Special : औषध खरेदीचा घोळ; संचालक पदही रिक्त; राज्यात आरोग्य सेवेचा बोजवारा
अजितदादांची नाराजी का?
अजितदादांच्या नाराजीमागे निधी आणि पालकमंत्रीपदाचे फेरवाटप हे दोन्ही जुने वाद कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. मागील काही दिवसांपासून शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांनी पुन्हा जुना सूर आळवायला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. अजितदादा निधी देत नाहीत, आमची फाईल पुढे सरकवत नाहीत, अशा तक्रारी शिवसेना आमदार आणि मंत्र्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्या आहेत. निवडणुका जवळ आल्या आहेत. अशावेळी मतदारसंघात निधीच नसेल तर विकासकामे कशी करणार? त्याचवेळी राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या मतदारसंघात बंपर निधी मिळत आहे, स्थगिती मिळालेली कामे पुन्हा सुरु झाली आहेत, शिवसेनेचाच मुख्यमंत्री असूनही शिवसेनेला फायदा होत नसल्याच्या या तक्रारी शिंदेंच्या कानावर घातल्या जात आहेत.
दुसऱ्या बाजूला पालकमंत्रीपदावरुन राष्ट्रवादीत खदखद वाढली आहे. शिंदे सरकारमध्ये अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांचा समावेश होऊन आता तीन महिने पूर्ण झाले आहेत. या काळात या मंत्र्यांना खातेवाटप झाले, मात्र अद्यापही त्यांच्याकडे कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिलेले नाही. निवडणुकांच्या तोंडावर लवकरात लवकर पालकमंत्रीपदाचे फेरवाटप करा अशी मागणी अजितदादांच्या गटाकडून करण्यात येत आहे. मात्र शिंदेंकडून या मागणीला प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी अनेक दिवसांपासून मागणी करुनही अद्याप पालकमंत्रीपदाचे फेरवाटप करण्यात आलेले नाही.
नांदेड दुर्घटना! ‘डीनला तत्काळ निलंबित करा’; विजय वडेट्टीवारांनी काढले वाभाडे
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजितदादांकडून तीन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा आग्रही प्रस्ताव आहे. त्यामुळे पालकमंत्रीपदाचे फेरवाटप रखडले आहे. पुणे, सातारा आणि रायगड या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदांची मागणी अजितदादांकडून करण्यात आली आहे. मात्र पुणे सोडण्यासाठी भाजप तयार नाही, तर साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंत्री शंभुराज देसाई यांनी विरोध दर्शविला आहे. रायगडमध्येही शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी आदिती तटकरे यांना पालकमंत्री करण्यास विरोध दर्शविली आहे. हा विरोध इतका तीव्र होता की 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणासाठी तटकरे यांना पालघरला पाठविण्यात आले होते.
त्यामुळे पालकमंत्रीपदाचे फेरवाटप आता लवकरात लवकर करावे, अशी मागणी करत अजितदादांच्या गटातील मंत्र्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली. याच दोन्ही वादांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नव्या संबंधात मिठाचा खडा पडला असल्याचे बोलले जात आहे. यातूनच मागील काही दिवसांपासून अजित पवार यांनी त्यांच्या कृतींमधून त्यांची नाराजी दाखवून दिल्याचे दिसून येत आहे. आधी शहांच्या दौऱ्याकडे पाठ, वर्षा बंगल्यावर न जाणे आणि आता मंत्रालयात असूनही त्यांनी कॅबिनेट बैठकीला दांडी मारणे, या सर्वांमुळे अनेक सवाल विचारले जात आहेत.