Devendra Fadnavis replies Sanjay Raut : अयोध्येत प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा (Ram Mandir) अगदी जवळ आलेला असतानाच यावरून सुरू झालेले राजकारण मात्र थांबलेले नाही. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी श्रीराम मंदिराच्या बांधकामाबाबत केलेल्या दाव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) चांगलाच संताप व्यक्त केला. आयुष्यात मी एक गोष्ट पाळतो की मी मु्र्खांना उत्तर देत नाही, अशा शब्दांत त्यांनी संजय राऊतांना उत्तर दिले. मुंबादेवी मंदिराबाहेर फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) मुद्द्यावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली.
मंदिर वही बनाएंगे असा नारा त्यावेळी भाजपने दिला होता. पण आता तुम्ही जाऊन पाहा मंदिर कुठं उभारलं आहे. आताचं मंदिर जिथं आश्वासन दिलं गेलं होतं त्याठिकाणी नाही तर त्यापासून चार किलोमीटर दूर अंतरावर बांधलं गेलं आहे. जिथे राम मंदिर बांधणार असं सांगितलं गेलं होतं तिथे ते मंदिर बांधले गेलेले नाही. ती वादग्रस्त जागा आजही तशीच आहे, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता.
राऊतांच्या याच वक्तव्यावर आज पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. त्यावर फडणवी म्हणाले, ज्यांचं या आंदोलनात काहीच योगदान नाही असे लोक आरोप करून स्वतःचं हसं करून घेत आहेत. कोट्यावधी हिंदूंचा अपमान करत आहेत. आता तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने हिंदूंचा अपमान करणं बंद करावं. आयुष्यात मी एक गोष्ट पाळतो की मी मु्र्खांना उत्तरं देत नाही. पण, एक मात्र सांगेन की देशातील हिंदूंचा अपमान बंद करा. तुमचं रामजन्मभूमी आंदोलनात कोणतेही योगदान नाही, अशा शब्दांत फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस आज मुंबईतील मुंबादेवी मंदिरात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला केलेल्या आवाहनानुसार आज फडणवीस यांनी मंदिरात साफसफाई अभियान राबवले. राज्यातील विविध मंदिरात सध्या स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी नाशिक येथील काळाराम मंदिरात आले होते त्यावळी त्यांनी मंदिरात साफसफाई केली होती. त्यानंतर त्यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभुीमीवर देशातील मंदिरांत सफाई मोहिम राबवण्यात असे आवाहन केले होते.