Download App

परबांना समज अन्, टांगा पलटीचा उल्लेख ; आक्रमक झालेल्या शिंदेंनी बाहेर काढला ठाकरेंचा माफीनामा

तुमचे साहेब मोदींकडे जाऊन माफी मागून आलेत. तुमचाही इतिहास मला माहिती आहे. त्यामुळे मला जास्त बोलायला लावू नका अशी तंबी त्यांनी अनिल परब यांना दिली.

Eknath Shinde : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) आज विधानपरिषदेत आक्रमक भाषेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली. नागपूर हिंसाचारावर भाष्य (Nagpur Violence) करतना त्यांनी ठाकरे गटावर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरे यांच्यासह अनिल परब यांनाही चांगलेच धारेवर धरले. वाघाचे कातडे पांघरून लांडगा वाघ होत नाही. तुमचे साहेब मोदींकडे जाऊन माफी मागून आलेत. तुमचाही इतिहास मला माहिती आहे. त्यामुळे मला जास्त बोलायला लावू नका अशी तंबी त्यांनी अनिल परब यांना दिली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर हिंसाचारावर विधिमंडळात निवेदन सादर केले. दंगलीची घटना नेमकी कशी घडली, यानंतर पोलिसांनी काय कार्यवाही केली याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. औरंग्याचं उदात्तीकरण थांबलच पाहिजे. औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची जी मागणी केली जात आहे ती चुकीची आहे का आजिबात नाही. जगाचा इतिहास पाहिला तर जे आक्रमणकारी होते त्यांच्या खुणा पुसून टाकण्यात आल्या आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी तर देवेंद्र फडणवीसांची थेट औरंगजेबाशी तुलना केली. म्हणाले क्रूर प्रशासक आहे. त्यांच्यात काय क्रूरपणा दिसला. त्यांनी सपकाळांचे काय डोळे काढले का? जीभ कापली का? चामडी सोलली का? काय बोलायचं कुणाचीही तुलना कुणाशी करायची. जे औरंग्याचं उदात्तीकरण करतात ते थांबलं पाहिजे अशी अपेक्षा एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

Video : पाकिस्तानतला अब्बा आठवेल अशी कारवाई होईल; नागपूर हिंसाचारावर काय म्हणाले राणे?

यानंतर एकनाथ शिंदे ठाकरे गटावर चांगलेच बरसले. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्यावर केंद्राच्या नोटीसीला घाबरून भाजपसोबत पळून गेल्याचा आरोप केला होता. हाच धागा पकडत शिंदेंनी ठाकरे गटावर घणाघाती टीका केली. या लोकांनी खु्र्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले. औरंगजेबाचे विचार धरले आणि खुर्ची मिळवली. म्हणून तुम्हाला हिंदुत्वावर बोलण्याचा काहीच अधिकार नाही. 2019 मध्ये तुम्ही काँग्रेसबरोबर जाऊन सत्ता मिळवली. हे  गेले होते लोटांगण घालून आले. म्हणाले मला वाचवा नंतर पुन्हा पलटी मारली.

पण आम्ही तुमचा टांगा पलटी करून राज्यात महायुतीचे सरकार आणले. हे करायला वाघाचे काळीज लागते. लांडगा वाघाचे कातडे पांघरून काही वाघ होत नाही. तो लांडगाच राहतो. त्यासाठी वाघाचे काळीज लागते. अनिल परब तुमच्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. नोटीसीला घाबरून कोण कुठे गेले होते हे मला चांगलच ठाऊक आहे. तुम्हाला नोटीस आल्यानंतर तुम्ही कुठे गेला होतात हे देखील मला माहिती आहे. मी खुर्चीसाठी काहीच केले नाही.

महाविकास आघाडीचे सरकार असताना ह्या लोकांनी देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, गिरीश महाजन आणि आशिष शेलार या लोकांना जेलमध्ये टाकण्याचा कट रचण्यात आला होता. त्यामुळे मी महाविकास आघाडीचं सरकार पलटी करून टाकले. एक आतली गोष्ट सांगतो ह्यांचे प्रमुख (उद्धव ठाकरे) मोदींना भेटायला गेले आणि मला वाचवा म्हणून माफी मागू लागले. अनिल परब तुम्ही सुद्धा दिल्लीला गेला होतात आणि तिथे जाऊन माफी मागितली. पण त्यानंतर राज्यात येऊन मात्र पलटी मारली अशी टीका एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर केली.

follow us