Download App

…तर नरकात जाऊन स्वर्ग शोधण्याची वेळच आली नसती; DCM शिंदेंचा राऊतांना टोला

बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहिला असता तर नरकात जाऊन स्वर्ग शोधण्याची वेळ आली नसती, असा टोला शिंदेंनी राऊतांना लगावला.

Eknath Shinde on Sanjay Raut : संजय राऊतांनी (Sanjay Raut) नरकातील स्वर्ग या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट केलेत. या पुस्तकाचं आज उद्या (दि. १७ मे) मुंबईत प्रकाशन होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक आणि चित्रपट पटकथालेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन केलं जाणार आहे. दरम्यान, या पुस्तकावर आता उपमुमख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) प्रतिक्रिया दिली.

बीडमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवा; दमानियांकडून अनेकांना घाम फोडणारी खळबळजनक मागणी 

बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहिला असता तर नरकात जाऊन स्वर्ग शोधण्याची वेळ आली नसती, असा टोला शिंदेंनी राऊतांना लगावला.

पुणे जिल्ह्यातील कात्रज विकास आघाडीचे संस्थापक नमेश बाबर, अध्यक्ष स्वराज बाबर आणि त्यांचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. ठाणे येथील उपवनमधील महापौर बंगल्यावर झालेल्या या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांच्यासह अनिल कोंढरे, गणेश मोहिते, सिद्धार्थ वंशी, तानाजी दांगट, निलेश धनावडे, नितीन कोमन, गणपततात्या गुजर, भालचंद्र पवार आणि उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे आणि ग्रीक रोमन महाराष्ट्र केसरी असलेला संग्राम बाबर यानेही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.

राऊत असा आव आणतात, जणू ते स्वातंत्र्यवीरच, त्यांची टीआरपीसाठी सगळी धडपड; निलम गोऱ्हेंची टीका 

यावेळी बोलताना शिदे म्हणाले की, कात्रज विकास आघाडीच्या माध्यमातून गेली पंधरा वर्षे कार्यरत असलेल्या नमेश यांनी आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे. आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे त्यांनी माझ्याकडे केलेल्या कात्रजचा विकास आराखडा, कात्रजची वाहतूक कोंडीची समस्या, पाण्याची समस्या सोडवण्याची मागणी केली असून या समस्या सोडवायला त्यांना नक्की सहकार्य करू. त्यांच्या सोबत असलेल्या गावातील लाडक्या बहिणींनी त्यांना माझ्यासोबत जाण्याचा सल्ला दिला आहे, असे त्यांनी मला सांगितले. त्यांनी शिवसेनेवर दाखवलेला हा विश्वास नक्की सार्थ ठरवू, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला.

आज त्यांच्यासोबत अनेक पैलवानांनाही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला असून त्यामुळे शिवसेना अधिक बलवान झाली असल्याची भावना शिंदेंनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

संजय राऊत यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकातून केलेल्या खुलाशाबाबत विचारले असता शिंदे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देऊन ज्यांनी गद्दारी केली, ती त्यांनी केली नसती तर नरकात जाऊन स्वर्ग शोधण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती, असं शिंदे म्हणाले. बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाशी एकनिष्ठ होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातसाठी केलेले काम आणि देशासाठी त्यांची असलेली तळमळ लक्षात आल्यानेच हिंदुत्वाचा विचार पुढे नेणारे नेतृत्व ओळखून बाळासाहेबांनी त्यांना वाचवण्यासाठी आपला शब्द टाकला होता. मात्र जे आज त्यांचे विचार सोडून काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसले आहेत, त्यांना बाळासाहेबांची त्यामागील भूमिका समजणे शक्य नाही, असं शिंदे म्हणाले.

यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेना सचिव राम रेपाळे, रणजीत पायगुडे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

follow us