नागपूर : आपलं सरकार सत्तेत येऊन सहा महिन्यांचा कालावधी झाला आहे. या संपूर्ण कालावधीत महाराष्ट्रातील निर्णय-लकवा आपण संपविला. निर्णय न घेणे, हाच महाविकास आघाडीचा सर्वात मोठा निर्णय होता, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष बैठकीत महाविकास आघाडीवर केली.
गेल्या अडीच वर्षात कोणत्याही घटकाला मदत त्यांनी केली नाही. विकास कामांना स्थगिती द्यायची, कोणत्याही घटकाचा विचार करायचा नाही. केवळ घोषणा करायच्या, अंमलबजावणी करायची नाही. कोरोना काळात मदत केली नाही, अतिवृष्टीच्या काळात कोणाला मदत केली नाही. पण आपलं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे आहे. आतापर्यंत सात हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना दिली आहे, असे फडणवीस म्हणाले.
अतिशय धडाडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार काम करते आहे. ती स्पीड मॅच करता येत नाही म्हणून विरोधक प्रचंड अस्वस्थ आहेत. अडीच वर्षातील नाकर्तेपणा लपवण्यासाठी विरोधक ‘नरेटिव्ह’ तयार करायचा प्रयत्न करीत आहेत. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावे मागण्यात आले, तेव्हा आज आंदोलन करणारे गप्प बसायचे. आता रस्त्यावर फक्त अस्वस्थतेतून उतरत आहेत. त्यामुळे आपली लढाई विरोधकांशी नाहीच. आपल्याशी लढण्याचा त्यांच्यात दमच नाही. आपली लढाई नरेटिव्हशी आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.