मुंबई : भाजप कोण्या एका नेत्यासाठी नाही तर पक्ष म्हणून निवडणूक लढणार आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी इच्छुकांनी दबावतंत्र वापरल्यास अगदी दोन-चार टर्म खासदार असलेल्यांचीही गय केली जाणार नाही. अशी तंबी उपमुख्यमंत्री आणि भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश पदाधिकारी बैठकीत फडणवीसांनी उपस्थितांन मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलत होते. (Devendra Fadnavis has warned that candidates will not be considered for tickets if they use pressure)
फडणीवस म्हणाले, उमेदवारीसाठी कोणत्याही नेत्याने पक्षाला गृहीत धरू नये. त्या मतदारसंघातून त्या उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता आणि पक्षाशी संबंधित अन्य गोष्टींचा विचार करुनच उमेदवारीबाबत संसदीय मंडळाकडून निर्णय घेतला जाईल. त्यामुळे बॅनरबाजी किंवा अन्य माध्यमातून दबाव आणणाऱ्यांचा विचारच केला जाणार नाही, अगदी दोन-चार टर्म खासदार असलेल्यांचीही गय केली जाणार नाही. पक्षाचे धक्कातंत्र तुम्ही पाहिलेच आहे, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.
येत्या निवडणुकांमध्ये आपलाच विजय पक्का आहे, असे समजून प्रयत्न करणे सोडू नका. पक्षाचे काम शेवटच्या घटाकापर्यंत पोहचवणे सुरु ठेवा. नवीन कार्यकर्ते जोडा, शिवाय या निवडणुकांमध्ये कोणाला तिकीट मिळेल, कोणाला नाही याची चिंता करु नका. तिकीट वाटपाचा निर्णय भाजपमध्ये संसदीय बोर्ड करत असते, असेही यावेळी फडणवीस यांनी स्पष्ट केले.
पदाधिकाऱ्यांनी जाहीरपणे वाद आणि मतप्रदर्शन करू नका. वरिष्ठ नेत्यांकडे भूमिका मांडून सामोपचाराने वाद मिटवा. आपल्या संपत्तीचे प्रदर्शन आजिबात करू नका, साधेपणाने राहा. लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत त्यादृष्टीने तयारी करण्याची आता गरज आहे. महिला, शेतकरी, गरीब आणि युवकांवर जास्त लक्ष केंद्रीत करा, अशा सूचना फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
यापूर्वी मध्यप्रदेश, राजस्थान आणि त्याआधी गुजरात व अन्य राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपने प्रस्थापित नेत्यांना धक्का दिला. विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारत नवख्यांना रिंगणात उतरविले. तर शिवराजसिंह चौहान, वसुंधराराजे, रमणसिंह यांच्यासह मातब्बर नेत्यांना मुख्यमंत्रीपद न देता नवीन खांद्यावर धुरा सोपविली. त्याधर्तीवर आता लोकसभा निवडणुकीतही उमेदवारी देण्याचे धोरण पक्ष राबविणार असल्याचे संकेत आहेत.