मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबेंच्या उमेदवारीवरुन मोठा ड्रामा पाहायला मिळाला. शेवटच्या दिवशी कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या डॉ. सुधीर तांबे यांनी आपल्या मुलगा सत्यजित तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यानंतर भाजपने सत्यजित तांबे यांना अप्रत्यक्षपणे जाहीर पाठिंबा दिलाय.
सत्यजित तांबेच्या उमेदवारीबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, ‘योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, सत्यजित तांबे यांचं काम चांगलं आहे. परंतु सगळे राजकीय निर्णय धोरणाप्रमाणे करावे लागतात.
या सर्व घडामोडीमागे तुमचा हात आहे असं बोललं जातयं, या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, आम्ही कोणतंही गणित घडवलेले नाही. मी त्यांच्या पुस्तक प्रकाशनाला गेलो होतो, पण सगळेच नेते तिथं होते. त्यामुळं हा घटनाक्रम चुकीच्या पद्धतीने जोडू नये. योग्यवेळी सगळं समोर येईल.
भाजपने जाणिवपुर्वक उमेदवार दिला नाही का? या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, कोणता उमेदवार द्यायचा यावर आमची चर्चा सुरू होती. राजेंद्र विखेंनी उमेदवारी घ्यावी असं आमचं म्हणणं होतं पण ऐनवेळी त्यांनी उमेदवारीला नकार दिला.
दरम्यान, भाजपने राज्यातील पाचही मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेआधीच जाहीर केले होते. मात्र, नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून सस्पेंस ठेवण्यात आला होता. मागील 20 वर्षांपासून कॉंग्रेसचे एकनिष्ठ समजले जाणारे तांबे पिता-पुत्रांकडून उमेदवारीबाबत असा गेम खेळण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगलीय.