सरकारचे संकटमोचक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे हनुमान, जळगावचे (Jalgaon) वजनदार नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचा मतदारसंघ म्हणजे जामनेर. अनेक जण आले, टक्कर दिली आणि गेले. पण गिरीश महाजन जामनेरमध्ये कायम राहिले. महाजन 1995 पासून सलग सहाव्यांदा जामनेरमधून निवडून आले आहेत. एक साधा सरपंच ते राज्याचे जबाबदार मंत्री अशी ओळख त्यांनी मागच्या 30 वर्षांमध्ये मिळवली आहे.
महाजन यांची खऱ्या अर्थाने कारकीर्द उजळून निघाली ती जळगावमध्ये खडसे पर्वाला फुलस्टॉप लागल्यानंतर. ते आज घडीची फडणवीस यांच्यानंतर भाजमधील सगळ्यात वजनदार नेते बनले आहेत. याच वजनदार नेत्याला जामनेरमध्ये घेरण्यासाठी महाविकास आघाडीने तगडा प्लॅन बनवला आहे. महाजन यांच्याविरोधात लढण्यासाठी तीन मोठ्या नावांची चर्चा सध्या जामनेर मतदारसंघात सुरु आहे. कोण आहेत हे नेते? आणि गिरीश महाजन यांना टफ फाईट होऊ शकते का?
जामनेर तालुक्यावर गिरीश महाजन यांनी एकहाती वर्चस्व तयार केले आहे. त्यांना आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांनी आव्हान देण्याचा प्रयत्न केला. पण भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आणि गिरीश महाजन यांच्या नेटवर्कने तालुक्यात त्यांची ‘वोटबँक’ मजबूत करून ठेवली आहे. महाजन यांचा पराभव करण्यासाठी सोनिया गांधी यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्यांनी जामनेरमध्ये सभा घेतली आहे. तरीही गिरीश महाजन अजिंक्य राहिले आहेत. केवळ आमदारकीच नाही तर जामनेर नगरपालिकेवर भाजपाने विक्रमी मताधिक्याने सत्ता मिळविली होती. तिथे त्यांच्या सौभाग्यवती साधना महाजन याच नगराध्यक्ष झाल्या होत्या. पंचायत समितीही महाजन यांनी बहुमताने ताब्यात ठेवली.
गिरीश महाजन यांची खऱ्या अर्थाने कारकीर्द उजळून निघाली ती राज्याच्या मंत्रिमंडळातून एकनाथ खडसे यांची गच्छंती झाल्यानंतर. खडसेंच्या राजीनाम्याने जळगावमधील गणितेच बदलली. महाजन जिल्ह्याच्या राजकारणात ड्रायव्हिंग सीटवर आले. जळगाव महानगरपालिका निवडणूक, जिल्हाध्यक्ष निवड, खासदारकीसाठी उमेदवाराची निवड तसेच इतर पदांच्या नियुक्त्या या सगळ्यांवर महाजन यांचाच वरचष्मा राहिला. मागील दहा वर्षांच्या काळात राज्यातील भाजप-शिवसेना सरकारच्या सत्तेचा उपयोग करत महाजन यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते फोडत आपली ताकद वाढवली आहे. महाजन म्हणतील तिच तालुक्यात पूर्व दिशा बोलली जाऊ लागली.
महाजन यांनी एक मास्टर स्ट्रोक खेळला तो लोकसभा निवडणुकीपूर्वी. त्यांचे कट्टर विरोधक आणि एकेकाळी त्यांच्या विरोधात निवडणूक लढलेल्या गजानन गरुड शिक्षण संस्थेचे प्रमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे संजय गरुड यांना महाजन यांनी भाजपमध्ये आणले. 2019 ला संजय गरुड यांनी महाजनांना टफ फाईट दिली होती. त्यामुळे आजच्या घडीला महाजन यांना जामनेर तालुक्यात कोणीही मोठा विरोधक राहिलेला नाही. जामनेर तालुका तसा शेतकऱ्यांचा, मजुरांचा, नोकरदारांचा आणि शिक्षक लोकांचा म्हणून प्रसिद्ध आहे. या सर्व घटकांना जोडून ठेवण्यात गिरीश महाजन यशस्वी ठरले आहेत. एकूणच महाजन यांना पराभूत करेल अशा चेहऱ्याच्या शोधात महाविकास आघाडी आहे.
महाविकास आघाडीच्या प्राथमिक चर्चेत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला सुटणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे शरद पवार यांच्याकडे तीन पर्याय आहेत. यात पहिले नाव आहे दिलीप खोडपे यांचे. खोडपे हे मुळचे भाजपचे आणि एकनाथ खडसे यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षही राहिले आहेत. सध्या खोडपे शरद पवार यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्या निकटवर्तीचा संवाद सुरू आहे. हा संवाद यशस्वी झाल्यास ते आगामी विधानसभा निवडणुकीत महाजन यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार असतील हे नक्की.
खोडपे यांच्या उमेदवारीवर चर्चा होण्याचे आणखी एक कारण म्हणजे ते जळगाव जिल्ह्यात मराठा समाजाचा मोठा चेहरा म्हणून परिचित आहेत. जामनेर मतदारसंघात एक लाख चाळीस हजारांच्या आसपास मराठा समाजाची मते आहेत. याउलट गिरीश महाजन यांचा समाज अल्पसंख्यांक आहे. मनोज जरांगे पाटील यांचाही महाजन यांच्यावर राग आहे. सध्या त्यांनीही या मतदारसंघात जोर लावून वातावरण फिरवण्याचा प्रयत्न केला आहे. महाजन गत साडे सात वर्षांपासून सत्तेत असल्याने अनेक दृश्य, अदृश्य विरोधक तयार झाले आहेत. या सर्व विरोधकांची मोट बांधण्याचे काम देखील अदृश्य शक्ती कडून सुरू आहे. शिवाय महाजन यांच्याविरोधात 30 वर्षांपासूनची अँटी इन्कमबन्सीही निर्माण झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे महाजन फारसे सुरक्षित आहेत, असे म्हणता येणार नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे दुसरी दोन नावे आहेत ती म्हणजे 2014 ला राष्ट्रवादीकडूनच लढत दिलेले दिगंबर पाटील. त्यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढूनही 67 हजार मते घेतली होती. त्यामुळे त्यांची ताकद नाकारुन चालत नाही. तिसरे नाव म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक आणि 2004 पासून विधानसभेचा तयारी करणाऱ्या पण प्रत्येक वेळेस डावलण्यात आलेल्या बंगालसिंह चितोडीया यांचे. महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीने या तिन्ही नावांचा मध्यंतरी सर्वे केल्याची माहिती आहे. यात जो कुणी महाजनांना चितपट करु शकतो त्याच्या हातात शरद पवारांची तुतारी येईल, हे नक्की आहे.