Shivaji Kalge Loksabha Candidate : लोकसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली आहे. कॉंग्रेसने महाराष्ट्रासह सात राज्यातील ५७ उमेदवारांची यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये राज्यातील सात जणांचा समावेश आहे. लातूरमधून डॉ. शिवाजी काळगे (Dr. Shivaji Kalge) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. दरम्यान, लातूरमधून उमदेवारी जाहीर झालेले शिवाजी काळगे आहेत तरी कोण? याच विषयी जाणून घेऊ.
Loksabha Election : शाहू महाराज, धंगेकर, प्रणिती शिंदेंना लोकसभेची उमेदवारी; सात जणांची यादी जाहीर
आतापर्यंत काँग्रेसला लातूर मतदारसंघात उमेदवार आयात करावे लागत होते. 2009 मध्ये काँग्रेसचा हा प्रयोग यशस्वी झाला, पण तेव्हा जिल्ह्याचे नेतृत्व विलासराव देशमुख यांच्याकडे होते. मात्र, त्यानंतर लातूरमध्ये काँग्रेसला लोकसभा निवडणूक जिंकता आली नाही. त्यामुळं 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शिवाजी काळगे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांचे नाव चर्चेत होते. मात्र, काँग्रेसने ऐनवेळी मच्छिंद्र कामत यांना उमेदवारी जाहीर केली होती. परिणामी त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, यावेळी पक्षाने चूक सुधारत काळगे यांना उमदेवारी दिली.
मोठी बातमी! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक
नगराळेंचा पत्ता कट
लातूरमध्ये काँग्रेसकडून नवीन चेहऱ्याला मैदानात उतरवण्याची तयारी सुरू होती. त्यामध्ये भाई नगराळे यांचं नाव मागे पडत डॉ. शिवाजी काळगे यांचे नाव पुढं आलं होतं. तसेच या शर्यतीत दलित पँथरचे नेते दीपक केदार यांनीही आपण काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे जाहीर केले होतं. पण, काँग्रेसने काळगे यांच्या नावाला पसंती दिली.
स्थानिक उमेदवार म्हणून काळगेंना पसंती
काळगे हे उच्चशिक्षित आहेत. शिवाय ते स्थानिक आहेत. लातूर जिल्ह्यातील राणी अंकुलगा येथील ते रहिवासी आहेत. त्यांचा जन्म १९६९ साली झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण निलंगा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत झाले. तर माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण लातूर येथे झाले. वैद्यकीय शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद येथे झाले. १९९७ पासून त्यांनी लातूर शहरात नेत्रतज्ज्ञ म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यांची पत्नी सविता ह्या स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. शिवाजी काळगे हे अनुसूचित जातीचे असल्याने लातूर राखीव मतदार संघातून तिकिटासाठी गेल्या तीन टर्मपासून प्रयत्न करत होते.
दरम्यान, भाजपने यापूर्वीच लातूरमधून विद्यमान खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या नावाची घोषणा केली आहे.त्यामुळं लातूरमध्ये श्रृंगारे विरुध्द काळगे असा सामना रंगणार आहे.\
कोणाला मिळाली उमदेवारी?
कॉंग्रेसने नंदुरबारमधून गोवल के पाडवी, अमरावतीमधून बलवंत वानखेडे, नांदेडमधून वसंतराव चव्हाण, पुण्यातून रवींद्र धंगेकर, सोलापूरमधून प्रणिती शिंदे, कोल्हापूरमधून शाहू महाराज आणि लातूरमधून डॉ. शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.