Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दोन दिवसांचा अयोध्या दौरा चांगलाच चर्चेचा ठरला आहे. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांनी एकत्र येत अयोध्येत जाऊन हिंदुत्वाचा नारा दिला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे बहुतांश आमदार सोबत होते. मात्र, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची अनुपस्थिती ठळकपणे लक्षात आली आहे.
सत्तार यांच्याशिवाय डोंगर झाडीफेम शहाजी बापू पाटील यांची गैरहजेरी अनेकांना जाणवली आहे. अपक्ष आमदार बच्चू कडू हे देखील दौऱ्यात नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना आपण हिंदुत्वासाठी जात असल्याचा दावा शिंदे यांनी केला होता. त्यांचे बहुतांश आमदार तेच मत मांडत होते. मात्र, सत्तार यांचा हिंदुत्वाशी काय संबंध असा सवाल शिवसेनेकडून उपस्थित केला जात होता. योगायोगाने सत्तार हे अयोध्या दौऱ्यात नसल्याने साहजिकच विरोधकांना आता आयता मुद्दा मिळाला आहे. अब्दुल सत्तार हे आज गारपीटग्रस्त भागातील दौरा करण्यासाठी जालना जिल्ह्यात असल्याचे सांगण्यात आले आहे.
आसामचे मुख्यमंत्री आता गांधींविरोधात आक्रमक!… म्हणाले १४ एप्रिलनंतर खेचणार…! – Letsupp
दुसरीकडे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील हेही नसल्याने विमानात आणि दौऱ्यात गप्पांचा फड रंगला नसल्याची चर्चा आहे. खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, प्रताप जाधव, भावना गवळी हे देखील दौऱ्यात सहभागी झाले नव्हते. आमदारांमध्ये किशोर पाटील, प्रताप सरनाईक, श्रीनिवास वनगा हे देखील अयोध्या दौऱ्यामध्ये नव्हते.
बच्चू कडू हे नाराज असल्याची चर्चा अधून-मधून होत असते. त्यामुळे ते दौऱ्यात सहभागी झाले नव्हते की इतर काही कारण होते. आता याचाही शोध शिंदे गटाला घ्यावा लागणार असल्याचे बोलले जात आहे.