मुंबई : आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शिळे अन्न दिल्याप्रकरणी मारहाण करणाऱ्या शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांना शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कडक शब्दांत समज दिली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ आमदार गायकवाड यांना समज दिली. लोकप्रतिनिधी या नात्याने रितसर तक्रार करता आली असती, या मारहाणीचे समर्थन करणार नाही, असे शिंदेंनी स्पष्ट केले.
मराठीसाठी उर बडवणाऱ्यांनी हिंदी सक्ती का स्विकारली? जाधवांची ठाकरेंवर नाव न घेता टीका
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीविषयी विचारले असता ते म्हणाले की, आमदार निवासातील कॅन्टीनमधील निकृष्ट दर्जाचे जेवण खाल्यामुळे आमदारांनाच नाही, तर सामान्य नागरिकांनाही त्रास होऊ शकतो. मात्र, संजय गायकवाड यांनी केलेली मारहाण समर्थनीय नाही. लोकप्रतिनिधी या नात्याने अन्नाच्या दर्जाबाबत रितसर तक्रारी करुन त्यावर कायदेशीर कारवाई करता येऊ शकते, पण मारहाण करणे हा पर्याय असू शकत नाही. मी संजय गायकवाड यांना समज दिली असून असं करणं योग्य नाही, आम्ही याचं समर्थन करत नाही, असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
तर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याबद्दल गायकवाड यांना निलंबित करण्याची मागणी केली. ते म्हणाले, एक माजलेला आमदार बनियन आणि लुंगीवर कॅन्टीमध्ये येऊन कर्मचाऱ्यांनी बॉक्सिंग करत मारतो. जर तुमच्यात हिंमत असेल तर त्या खात्याच्या मंत्र्यांना मारहाण करा. अशा आमदारांचा सरकारने बंदोबस्त करावा, त्यांचे निलंबन करावे, अशी मागणी परब यांनी केली.
आमदार गायकवाडांवर सभापतींनी कारवाई करावी..
परब यांच्यानंतर बोलताना फडणवीस म्हणाले, मी या प्रकरणाची माहिती घेतली आहे. तिथून माहिती आली की, भाजीला वास येत होता. आमदार निवासात काही चुकीच्या काही गोष्टी असतील तर त्यावर कारवाई करावी. परंतु लोकप्रतिनिधींनी कर्मचाऱ्यांना मारहाण करणे चुकीचे आहे. टॉवेल मारणं किंवा लुंगीवर मारणं असेल, मारणं चुकीचंचं आहे. यामुळे आमदारांबद्दल लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो. आपण कुठेतरी सत्तेचा गैरवापर करतो, अशा प्रकारची भावना लोकांमध्ये जाते, ही निश्चितच गंभीर बाब आहे आणि यावर सभागृहातील अध्यक्षांनी याची दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा. जी काही कारवाई करायची असेल ती करण्यात यावी, असं फडणवीस म्हणाले.
प्रकरण काय?
काल (८ जुलै) रात्री आमदार संजय गायकवाड यांनी मुंबईतील आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये जेवणाची ऑर्डर दिली. त्यांना ऑर्डरप्रमाणे रुममध्ये जेवणही पुरवण्यात आलं. मात्र, जेवणात देण्यात आलेलं डाळ आणि भात हे शिळं होतं आणि त्याचा वास येत होता, असा आरोप करत आमदार गायकवाड यांनी थेट कॅन्टीन व्यवस्थापकाला धारेवर धरलं आणि कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली.