अहमदनगरः शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर पक्षवाढीसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. जुन्या सहकाऱ्यांना पुन्हा पक्षात आणले जात आहे. आता ठाकरे गटाने शिर्डी (Shirdi) लोकसभेसाठी उमेदवार शोधला आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhuasheb Wakchaure) यांना पुन्हा पक्षात घेण्यात येणार आहे. भाऊसाहेब वाकचौरे हे भाजपमध्ये होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून ते सक्रीय नव्हते. आता ते उद्धव ठाकरे गटात येत्या 23 ऑगस्टला प्रवेश करणार आहेत.
प्रशासकीय अधिकारी राहिलेले भाऊसाहेब वाकचौरे हे २००९ ला शिर्डीतून शिवसेनेच्या तिकीटावर खासदार झाले होते. त्यांनी आघाडीकडून उमेदवार असलेले रामदास आठवले यांचा पराभव केला होता. परंतु 2014 मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना काँग्रेसमध्ये आणत लोकसभेची उमेदवारी दिली होती.
एेनवेळी शिवसेनेने सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली. लोखंडेंनी वाकचौरे यांचा पराभव केला होता. त्यानंतर वाकचौरे हे भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर ते श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावरही पराभूत झाले होते. त्यानंतर काही दिवस ते भाजपसाठी काम करत होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून ते राजकारणात सक्रीय नव्हते.
‘मविआ’कडून शाहू महाराज लोकसभा लढणार? आमदार सतेज पाटलांनी स्पष्टचं सांगितलं….
चार दिवसांपूर्वी ते मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे यांनी स्वतःच ठाकरे गटात प्रवेश करत असल्याचे जाहीर केले आहे. मी उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली आहे. येत्या 23 ऑगस्टला मुंबईत माझा पक्षप्रवेश होणार आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी कामाला सुरुवात करण्याचे सूचनाही ठाकरेंनी दिल्या असल्याचे वाकचौरे यांनी म्हटले आहे.
रायडर लूकमध्ये राहुल गांधी! लडाखमधील पॅंगॉन्ग त्सो तलावावर पोहोचले
तर पुन्हा रामदास आठवलेंशी लढत
खासदार सदाशिव लोखंडे हे शिंदे गटात गेले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेही पुन्हा या मतदारसंघातून मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांनी शिर्डीत एक मेळावा घेतला आहे. या मेळाव्यातही आठवले यांनी पुन्हा शिर्डीतून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ही जागा आठवले यांच्यासाठी सोडल्यास पुन्हा भाऊसाहेब वाकचौरे व आठवले अशी लढत होऊ शकते. तर हा मतदारसंघ काँग्रेसला हवा आहे. त्या दृष्टीने तयारी सुरू आहे.