वाराणसी विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान (Shivsena) शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक कमलेश केदारनाथ राय यांच्या परवानाधारक पिस्तुलातून अचानक दोन राउंड गोळीबार झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या घटनेत गोळी रिकोशेट होऊन सुरक्षा तपासणीतील दोन कर्मचारी जखमी झाले. घटनेनंतर विमानतळ परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षा यंत्रणांनी तातडीने राय यांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली.
मिळालेल्या माहितीनुसार, कमलेश राय हे पत्नीसमवेत वाराणसीहून मुंबईला जाण्यासाठी विमानतळावर आले होते. त्यांना एअर इंडिया एक्स्प्रेसच्या IX 1810 या विमानाने मुंबईला रवाना व्हायचे होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास शस्त्र तपासणी सुरू असताना पिस्तुल लॉक करत असताना त्यातून दोन गोळ्या सुटल्याची प्राथमिक माहिती आहे. राय यांच्याकडे 7.62 मिमी पिस्तुल आणि त्यासोबत 21 जिवंत काडतुसे असल्याचे सांगण्यात येत आहे.
रश्मी शुक्ला यांना शुभेच्छा देताच मिलिंद नार्वेकर पुन्हा चर्चेत; ठाकरे गटाच्या समर्थकांमध्ये संभ्रम
गोळीबारानंतर विमानतळावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत राय यांना ताब्यात घेतले. गोळी रिकोशेट होऊन सुरक्षा तपासणी कर्मचारी रोहित राज आणि सुमन कुमारी हे दोघे जखमी झाले. दोघांनाही तातडीने न्यू लक्ष्मी ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनीही विमानतळावर दाखल होत पुढील कारवाई सुरू केली.
दरम्यान, विमानतळासारख्या अतिसुरक्षित ठिकाणी परवानाधारक शस्त्रातून गोळीबार झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. शस्त्र विमानतळावर नेण्यासंदर्भातील परवानगी, त्याची तपासणी तसेच शस्त्र हाताळताना निर्धारित सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत विमानतळ सुरक्षा यंत्रणांसह BCAS कडूनही सखोल तपास केला जात असल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर पोलिसांकडून कमलेश राय यांची चौकशी सुरू असून गोळीबार नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याचा तपास केला जात आहे. चौकशीदरम्यान समोर येणाऱ्या तथ्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, घटनेनंतर विमानतळावरील परिस्थिती नियंत्रणात असून विमानसेवा आणि इतर कामकाज सुरळीत सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
