Download App

रघुराम राजन यांचा सात वर्षांनी होकार? महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठविण्यासाठी ‘मविआ’त खलबत

मुंबई : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ रघुराम राजन (Raghuram Rajab) महाराष्ट्रातून राज्यसभेवर (Rajya Sabha) जाणार असल्याचे वृत्त आहे. महाविकास आघाडीने एकच जागा लढविली तर काँग्रेसकडून आणि दोन जागा लढविल्या तर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणार उतरणार असल्याचे बोलले जात आहे. नुकतीच राजन यांनी शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. (Former Reserve Bank Governor and Senior Economist Raghuram Rajan will go to Rajya Sabha from Maharashtra?)

राजन यांचा सात वर्षांनी होकार?

रघुराम राजन 2013 ते 2016 असे तीन वर्षे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. त्यानंतर ते अमेरिकेतील शिकागो विद्यापीठमध्ये प्राध्यापक रुजू झाले. तिथे काम करत असतानाच 2017 मध्ये आम आदमी पक्षाकडून रघुराम राजन यांना राज्यसभेचे उमेदवार होण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र त्यावेळी त्यांनी राजकारणात येण्यास नकार देत शिकागो विद्यापीठात काम करण्यास प्राधान्य दिले होते. मात्र आता राजन यांनी राज्यसभेवर जाण्यास होकार दिला असल्याचे समजते.

“शेलारजी, हा तुमचा व्यक्तिद्वेष की पक्षसंस्कृती?” उद्धव ठाकरेंवरील टीकेला रोहित पवारांनी दिलं उत्तर

देशात 15 राज्यांमधील 56 जागांसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. यात महाराष्ट्रातील सहा जागांसाठी निवडणुकीची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रातून 2018 साली राज्यसभेवर निवडून गेलेल्या सहा खासदारांची मुदत दोन एप्रिल रोजी संपत आहे. यात नारायण राणे, प्रकाश जावडेकर आणि व्ही मुरलीधरन या भाजपच्या तीन, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या वंदना चव्हाण, काँग्रेसचे कुमार केतकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे अनिल देसाई यांचा समावेश आहे.

विधानसभेच्या सध्या दोन जागा रिक्त आहेत. त्यामुळे नियमानुसार एक जागा निवडून येण्यासाठी 41 मतांची गरज आहे. सध्या भाजपचे 104 आमदार आहेत. या संख्याबळानुसार भाजपच्या स्वतःच्या मतांवर दोन जागा सहज निवडून येऊ शकतात. त्यानंतर त्यांच्याकडे 22 मते शिल्लक राहतात. तर सरकारला 22 छोट्या पक्षांच्या आणि अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. या मतांच्या मदतीने भाजपची तिसरी जागाही निवडून येऊ शकते.

‘देवेंद्रजी पाव असो की अर्धे पण पुरुन उरले’; फडणवीसांसाठी नितेश राणे मैदानात

दुसऱ्या बाजूला सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची जागा शिंदेंच्या शिवसेनेला आणि राष्ट्रवादी (शरद पवार) गटाची जागा अजित पवार यांच्या गटाला जाणार हे निश्चित आहे. शिंदेंचे सध्या 39 तर अजितदादांचे 41 आमदार आहेत. त्यामुळे या दोन्ही जागांवर दोघांचेही उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. शिंदेंकडून मिलिंद देवरा यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. तर अजित पवार गटाकडून एखादा उद्योगपती किंवा पार्थ पवार यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

रघुराम राजन काँग्रेसचे उमेदवार की महाविकास आघाडीचे?

उरलेल्या एका जागेवर 44 आमदार असलेल्या काँग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून जाऊ शकतो. मात्र या मतदानानंतर काँग्रेसकडे तीन, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 17, राष्ट्रवादी (शरद पवार) 12 अशी 32 मते हक्काची शिल्लक राहतात. याशिवाय महाविकास आघाडीकडे समाजवादी पक्ष दोन, कम्युनिस्ट पक्ष एक, शेकाप एक आणि एमआयएम दोन अशी सहा म्हणजेच एकूण 38 मते शिल्लक राहतात. त्यामुळे रघुराम राजन काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की महाविकास आघाडीचे दुसरे उमेदवार म्हणून नशीब आजमावणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us