Uddhav Thackeray: शिवसेना आणि ठाकरे कुटुंब हे अतूट नाते होते. बाळासाहेब ठाकरे यांचा एक आदेश शिवसैनिकांसाठी शिरसावंद्य मानला जात होता. त्यांच्या काळात अनेक राजकीय बंड झाले. छगन भुजबळ, नारायण राणे यांनी पक्ष सोडत ठाकरेंना धक्का दिला. पुतण्या राज ठाकरे हे पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी मनसे हा स्वतंत्र पक्ष काढला आहे. अनेक धक्के पचवूनही शिवसेना (Shivsena) मजबूत होती. परंतु उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray) शिवसेना मजबूत राहिली. परंतु भाजपची साथ सोडल्यानंतर उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. परंतु त्यानंतर ठाकरे व सेनेला उतरता कळा लागली.
उद्या (19 जून) शिवसेनेचा 60 व्या स्थापनादिन आहे. परंतु हा पक्ष एकदा निर्णायक वळणावर आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठा राजकीय पेच आहे. लोकसभेत उद्धव ठाकरे सेनेचे नऊ खासदार आहेत. त्यातील सहा खासदार फुटल्याचे आता निश्चित झाले आहे. ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सात वर्षांत सेनेसाठी सर्वाधिक मोठे धक्के बसलेले आहेत.
जून महिना, बंडखोरी अन् संजय… उद्धव ठाकरेंच्या राजकारणातील विचित्र योगायोगाची जोरदार चर्चा
2019 ला युती फुटली…
शिवसेना आणि भाजप युती 2014 ला सत्तेत आली. भाजपचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. सेनेला चांगली मंत्रिपद मिळाली होती. पुढे 2019 ला शिवसेना आणि भाजप एकत्र लढले. जनतेने बहुमत दिले. परंतु मुख्यमंत्रिपदावरून वाद निर्माण झाला आणि युतीमध्ये काडी पडली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मोठा राजकीय निर्णय घेतला. थेट भाजपबरोबरची युती तोडत ठाकरे हे काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर गेले. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांच्यावर आयुष्यभर टीका केली, त्याच पक्षांसोबत युती केल्यामुळे शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली.
कोविड काळात पक्ष बळकटीला फटका
मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर काही महिन्यांतच कोविड-19 महामारी आली. लॉकडाऊन, आरोग्य व्यवस्थेवरील ताण, आर्थिक संकट आणि प्रशासनिक आव्हाने यांमध्ये उद्धव ठाकरे सरकारचा बहुतांश कार्यकाळ गेला. महामारीच्या काळातील त्यांच्या संवादशैलीचे अनेकांनी कौतुक केले. मात्र या संकटामुळे पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी त्यांना अपेक्षित वेळ आणि लक्ष देता आले नाही. त्याचा फटका बसला.
2022 मध्ये एकनाथ शिंदे यांचे बंड
उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे हेही होते. दुसरीकडे सर्वाधिक मोठा पक्ष असून, सत्तेबाहेर असलेला भाजपने मोठा डाव खेळला. त्यांनी एकनाथ शिंदे यांना गळाला लावले. शिंदे यांनी तब्बल चाळीसहून अधिक आमदारबरोबर घेत बंड केले. त्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. मूळ शिवसेना आणि पक्ष चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाले. शिंदे यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना बळ देत पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न केला.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश
2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची बाजूने सहानुभूतीची लाट होती. त्याचा फायदा राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरेसेनेला फायदा झाला. काँग्रेसचे सर्वाधिक 14, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आठ, ठाकरेसेनेचे नऊ खासदार निवडून आले. महाविकास आघाडीने 48 पैकी 31 जागा जिंकल्या. त्यामुळे महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड संपला नसल्याचे दिसून आले. सहानुभूतीची लाट, भाजपविरोधी मतदार आणि पक्ष हिरावला गेल्याची भावना यांच्या बळावर उद्धव ठाकरे पुन्हा पक्ष उभा करू शकतील, अशी शक्यता होती.
विधानसभा निवडणूक फिरल्याने धक्का
लोकसभा निवडणुकीत मतदार पाठीशी असल्याने महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा नेत्यांना पुन्हा सत्तेत येण्याचा विश्वास होता. परंतु लोकसभेचा झटक्यानंतर महायुतीने विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी लाडकी बहिण योजना ही गेमचेंजर घोषणा केलीय. त्याचा फायदा महायुतीला झाला आणि ते सत्तेत आले. परंतु महाविकास आघाडीचा घटक म्हणून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने 89 जागा लढवल्या. त्यापैकी केवळ 20 जागांवर विजय मिळविला. या निकालामुळे त्यांची राजकीय ताकद आणखी कमी झाली.
राज ठाकरेंसोबत युतीचा प्रयत्न अपुरा
त्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांचे चुलत बंधू राज ठाकरे यांच्यात राजकीय समन्वय होण्याच्या चर्चा सुरू झाल्या. दोघेही एकत्र आले पण मुंबई महानगरपालिका निवडणुकीत यशस्वी होऊ शकले नाहीत.
एकनाथ शिंदेंवर टीका करत राहिले पण
उद्धव ठाकरे, संजय राऊत हे एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर जाणाऱ्यांवर टीका करत राहिले. गद्दार, खोके चोर अशा टीकाही शिंदेंवर झाल्या. दुसरीकडे शिंदे हे पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत होते. पक्षामध्ये अनेकांना संधी देण्यात आली. उद्धव ठाकरे हे मात्र पक्ष बळकट करू शकले नाहीत. त्याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसून आला.
महाविकास आघाडीत ताकद राहणार का ?
सहा खासदार फुटणार हे नक्की झालेले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे तीन खासदार आणि वीस आमदार आहेत. खासदार फुटल्यानंतर आमदार फुटण्याची भितीही ठाकरेंना आहे. या सर्व परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीमध्ये ठाकरे यांचे राजकीय वजन कमी होणार आहे. आता तर तीन वर्षे मोठ्या कोणत्या निवडणुका नाहीत. काही जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. परंतु ग्रामीण भागात ठाकरेसेनेची ताकद नाही. त्यामुळे भविष्यातही ठाकरेसेनेला उभारी घेण्यासाठी कुठलीही राजकीय संधी दिसत नाही.
