केंद्र सरकारने कालच औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याला मंजुरी दिली आहे. त्यानंतर भाजप ( BJP ) आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांनी ट्विट करत केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. तसेच आता अहमदनगरचे (Ahmadnagar ) नामांतर अहिल्यानगर ( Ahilyanagar ) होणार, असे ट्विट केले आहे.
औरंगाबाद व उस्मानाबादचे नामांतर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार. आता अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणारच, असे ट्विट गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.
औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव केल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे आभार व अभिनंदन.त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ मा.@Dev_Fadnavis जी यांच्या नेतृत्वात होणारच.@BJP4Maharashtra @mieknathshinde
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) February 25, 2023
गेल्याकाही दिवसांपासून अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करण्यात यावे, अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर व राम शिंदे यांनी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे अहिल्यादेवींचा जन्म झाला आहे. त्यामुळे या जिल्ह्याचे नामकरण अहिल्यादेवींच्या नाववरुन करावे अशी मागणी करण्यात येते आहे.
दरम्यान शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी औरंगाबाद व उस्मानाबादचे नामांतर करण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीत मंजूर केला होता. तो प्रस्ताव त्यांनी केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्यांच्या या निर्णयाला केंद्र सरकारने देखील हिरवा कंदिल दिला आहे.
औरंगाबाद व उस्मानाबादचे नामांतर करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. हा निर्णय झाल्यानंतर औरंगाबाद व उस्मानाबाद येथे नागरिकांनी एकच जल्लोष केला आहे.