Download App

हिंगोलीसाठी ठाकरेंची रणनीती ठरली? काँग्रेसचा दावा खोडून काढण्यासाठी स्थानिक उमेदवाराचे नाव चर्चेत

Ambadas Danve on Hingoli Lok Sabha : काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण ( Ashok Chavan) यांनी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांसोबत कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन हिंगोली लोकसभा मतदार संघावर दावा केला होता. अशाचत आता हिंगोली येथील लोकसभेची (Hingoli Lok Sabha) जागा ही परंपरेने शिवसेनेची आहे. शिवसेनेच्या नावावर बाहेरून आलेल्या उमेदवाराला विजय मिळू शकतो तर हिंगोलीचा भूमिपुत्र उमेदवार झाल्यास मतदार त्याला डोक्यावर घेणार नाही का? असा सवाल करून ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी हिंगोली लोकसभेच्या जागेवर शिवसेना (ठाकरे गटाची) मजबूत दावेदारी सांगितली. (Hingoli Lok Sabha seat belongs to Shiv Sena Thackeray group leader Ambadas Danve claims)

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सध्या हिंगोली दौऱ्यावर आलेत. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की, हिंगोली लोकसभा मतदार संघात शिवसेनेची पाळेमुळे खोलपर्यंत रुजलेली आहेत. अगदी ग्रामपातळीवरील ग्रामपंचायत व सोसायट्यांवर शिवसेनेचे वर्चस्व असल्यामुळेच मार्केट कमिटीमध्ये पक्षाचे उमेदवार निवडून आले. हिंगोली, कळमनरी, व जवळा बाजार येथील सभापती शिवसेनेचे झाले याचा अर्थच असा आहे की, गावपातळी पर्यंत शिवसेनेची ताकद आहे. याच ताकदीवर शिवसेनेचा खासदार निवडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Rahul Kanal : दिशा सॅलियन प्रकरणाची फाईल पुन्हा… पक्षप्रवेश करताच राहुल कनालांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल 

धुळे जिल्ह्यातून नांदेडला रहायला आलेल्या हेमंत पाटील यांना शिवसेनेच्या नावावर हिंगोलीकर खासदार करत असतील तर हिंगोलीच्या भूमिपुत्रालाच उमेदवारी दिल्यास हिंगोलीतील मतदार त्याला आशिर्वाद नक्कीच देतील असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

हिंगोलीतील बैठकीपूर्वी अंबादास दानवे यांनी औंढा नागनाथ येथे नागनाथचे दर्शन घेतले. त्यानंतर सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. गोरेगाव येथील शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी पिकविमा, अतिवृष्टी अनुदान, बोगस किटकनाशके, चढ्या दराने बी बियाणे व खताची विक्री या सर्व विषयांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, या जागेसाठी महाविकास आघाडीतील कॉंग्रेस व ठाकरे गट या दोन्ही पक्षांना दावा सांगितला. त्यामुळं निवडणुकीपूर्वीच मविआतील वाद चव्हाट्यावर येऊ लागला असून हिंगोली लोकसभेची जागा कोणत्या पक्षाला सुटते, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us