Imtiaz Jaleel : माझ्यासमोर एमआयएम दोन वेळा हरलेल्या पूर्व मतदारसंघात विद्यमान सत्तेतील मंत्र्यांचे आव्हान होते. आयुष्यात मी पाहिलेली ही सर्वांत भ्रष्ट निवडणूक होती. ते स्वीकारून मी लढलो. (Imtiaz Jaleel) ते जिंकले अन् मी हरलो असलो तरी एमआयएमने बरोबरीने मते घेतली. या सर्व डावपेचात खऱ्या अर्थाने मी हरून जिंकलो असं मत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलं आहे.
त्यांनी पैसे खर्च न करता निवडणूक लढवली असती तर आज मी विधानसभेत आणि ते घरी बसले असते! पण, राजकारणात ‘जर- तर’ ला किंमत नसते. खिलाडूवृत्ती ठेवून आम्ही पुढे जात आहोत, असंही जलील यावेळी म्हणाले आहेत. माझ्या विरोधात निवडणूक काळात पत्रकार परिषदा घेणाऱ्या दलित समाजाच्या काही नेत्यांना प्रदीप जैस्वालांनी सात-सात कोटींच्या उद्योग उभारणीच्या योजना मिळवून दिल्या असा थेट घणाघात केला आहे.
अतुल सावेंनी निवडणुकीत पैसे वाटले, इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप, थेट व्हिडिओच दाखवले
त्यांना आलेल्या नोटिसा परत घेण्यात एकनाथ शिंदे यांनी मदत केली. यातून सामान्य दलित बांधवांचा फायदा न करता या नेत्यांनी सोने, गाड्या घेत ते पैसे हडपले. त्यांना मी कोर्टात जाऊन जाब विचारेन. त्यांनी कोणता उद्योग सुरू केला याचं उत्तर द्यावं लागेल. पैसे देणारे मी पकडले, पोलिसांनी सोडले. मतदानाच्या दिवशी महिलांना दीड हजार, एजंटला पाचशे रुपये दिले जात होते, मुस्लिम महिलांना रिक्षात जवाहरनगर पोलीस ठाण्यासमोर आणले जात होते. पण, पोलिसांना ते कळू शकले नाही असंही ते म्हणाले आहेत.
सर्व शासकीय यंत्रणा सत्ताधारी पक्षांना निवडून आणण्यासाठी तत्पर होती. हा लढा मी सुप्रीम कोर्टापर्यंत घेऊन जाईल. माझ्या तक्रारींवर दोन सुनावण्या झाल्या. तक्रारीची कॉपी मिळाली नाही म्हणून आमदार अतुल सावे यांच्या वकिलांना दोन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ मिळावा अशी त्यांनी विनंती केली. पण, मी विरोध केला. त्यामुळे आज दुसरी सुनावणी झाली. त्यात काही तथ्य नसल्याचे म्हटले आहे.
या व्यतिरिक्त मी नैराश्यातून अशा तक्रारी केल्याचे त्यांनी म्हटले. समितीचा अहवाल हास्यास्पद आहे. आंबेडकरनगरचा माणूस कोण होता हे समजून येत नाही असा रिपोर्ट दिलाय. जिल्हाधिकारी हसून म्हटले होते यात काही होणार नाही. मी त्यांना सुप्रीम कोर्टापर्यंत घेऊन जाईल, असंही जलील म्हणाले आहेत. तसंच, भाजपाने पाण्यासारखा पैसा खर्च केला. जिंकण्यासाठी जे काही चुकीचे प्रयोग करायचे त्यांनी केले. माझ्या विरोधात १३ मुस्लिम उमेदवार दिले असंही ते म्हणाले.