प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यावर मी काही त्यांच्याशी बोललेलो नाही. पुढ्या काळात त्यांच्याशी मी बोलणार आहे. तुम्हाला पक्षाने नक्की काय कमी केलं? तुम्ही भाजपमध्ये प्रवेश का केला? असं विचारणार असल्याचं आहिल्यानगरचे खासदार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके म्हणाले. ते लेट्सअप मराठीशी बोलत होते.
त्याचबरोबर, आज ते महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांच्याशी जेव्हा केव्हा माझी चर्चा होईल तेव्हा मी त्यांना पक्षांतराबाबत विचारणार आहे असंही लंके यावेळी म्हणाले. यावेळी लंके यांनी लाडकी बहीण योजनेवरही भाष्य केलं. आम्ही लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही. तुम्ही योजना चालू केली, पैसे देता मग ती योजना का बंद करता असं आम्ही विचारणार आहे असंही लंके यावेळी म्हणाले.
भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्राजक्त तनपुरे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते भाजप प्रवेशासाठी मुंबईत दाखल झाले. त्यावेळी त्यांनी शरद पवार आणि मामा जयंतराव पाटील यांना भेटण्याचं धाडस झाले नाही, अशी भावना व्यक्त केली होती. त्यामुळे त्यावेळीही राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले होतं. आता लंके यांच्या वक्तव्यानेही चर्चा सुरू झाली आहे.
अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून प्राजक्त तनपुरे मैदानात आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत 4 जून असल्याने निवडणुकीचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते, ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयंतराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
