Sharad Pawar Speech Undavadi : माझं वय काढू नका माझं वय काढू नका, तुम्ही काय बघितलं आहे माझं हा गडी थांबणारा नाही असे म्हणत शरद पवारांनी (Sharad Pawar) पुन्हा एकदा अजित पवारांसह (Ajit Pawar) वय काढणाऱ्यांविरोधात शड्डू ठोकला आहे. तुम्ही लोकांनी मला आमदार केल मंत्री केलं, चारवेळा मुख्यमंत्री केलं. मात्र तुम्ही लोकांनी मला 56 वर्ष एकही सुट्टी दिली नाही. शेतकरीदेखील आपल्या बैलाला सुट्टी देतो मात्र आपण मला सुट्टी देत नाहीत अशी मिश्किल टिप्पणी करत पवारांनी तुमच्यासाठी श्वासात श्वास असेपर्यंत काम करेल असा शब्द उपस्थितांना दिला. ते बारामतीतील उंडवडी येथे जाहीर सभेत बोलत होते. भाषणादरम्यान शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या लग्नाच्या गोष्टीपासून ते कान तुटलेल्या कपातल्या चहाचा किस्सा सांगितला.
श्वासात श्वास असेपर्यंत काम करणार
पुढे बोलतान पवार म्हणाले की, माझ्यावर टीका करणारे विरोधक वेळोवेळी माझं वय आता 84 झाल्याची आठवण करून देतात पण, माझं वय काढू नका, तुम्ही माझ काहीच बघितलं नाही, मी थांबणारा गडी नसून, माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत तुमच्यासाठी काम करेल अशी ग्वाही शरद पवारांनी दिली. गुजरात राज्याला कृषी मंत्री असताना प्रचंड मदत केली. मोदींना मला सांगितले की, मला बारामतीत यायचं आहे. ते इथं आले म्हणाले की, शरद पवारांनी मला शिकवलं. आपण स्वतः जनाई शिरसाईमध्ये लक्ष घालणार असून, काम पूर्ण कसं होत नाही बघतो. ज्यांच्यावर जबाबदारी दिली त्यांनी काम केलं नाही, आता हे काम मी पूर्ण करतो कारण माणसं माझी आहेत,असं म्हणत शरद पवार यांनी अजित पवार यांना टोला लावला.
तेव्हा गावोगावी भाकरी दिली जायची
यावेळी पवारांनी राज्यातल्या दुष्काळावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, आज राज्यात सगळीकडे दुष्काळाची परिस्थिती आहे. मी जेव्हा कृषीमंत्री होतो तेव्हा दुष्काळ पडल्यावर गावागावात भाकरी दिली जात होती. मात्र, सध्याच्या सरकारकडून याबाबत काहीच निर्णय घेतले जात नाहीये. शेवटच्या दहा वर्षात कृषिमंत्री होतो त्याचा मला सगळ्यात जास्त आनंद होतो असेही यावेळी पवारांनी सांगितले. मी देशाचा कृषिमंत्री झाल्यावर माझ्यासमोर पेच निर्माण झाला होता.त्यावेळी देशात अन्न धान्याचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र जो देश कृषिप्रधान देश आहे त्या देशात अन्न धान्याची आयात करणे मला पटले नाही. माझ्या काळात मी 71 हजार कोटींची कर्ज माफी केल्याचेही यावेळी पवारांनी सांगितले. शिवाय व्याजदरातही शेतकऱ्यांना सुट दिली. देशाचा कृषिमंत्री असताना मी शेतीत अनेक बदल घडवून आणले ज्यामुळे आज संपूर्ण जगात आपण 18 देशांना धान्य निर्यात करतो. देशातील सर्व शेतकऱ्यामुळे ही बाब घडून आल्याचे पवार म्हणाले.
ही तर हुकूमशाही…
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत शरद पवार म्हणाले की, सध्या पंतप्रधानांनी एक वेगळीच भूमिका घेतली आहे. ती म्हणजे कारवाई करण्याची भूमिका. आज जो कोणी मोदींच्या विरोधात बोलतो त्यांच्यावर कारवाई केली जात. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मोदींनी दिल्ली आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं, याला लोकशाही नव्हे तर, हुकुमशी असेच म्हणता येईल. येणाऱ्या दिवसात हे चित्र बदलले नाहीतर देशातील सत्ता मूठभर लोकांच्या हातात जाईल.
तुटलेल्या चहाच्या कपाची कहाणी
इथे उद्योग आले,पण घर बदललं का? पहिल्यांदा चहा पितळीत मिळवायचा, परत कान तुटलेला कप आला. त्यानंतर परिस्थिती बदलली, पूर्वी किल्टन बसायला टाकायचे, आता राहणीमान बदललं आहे. त्याचे कारण इथे कामं झाली आहेत. शरद पवारांनी यावेळी मुलगी सुप्रिया सुळे यांच्या लग्नातील किस्सा सांगितला. सर्वांनी सुप्रिया यांचं लग्नकार्य आपल्या मुलीचं कार्य असल्याप्रकारे केलं असं शरद पवारांनी सांगितलं. यावेळी ते म्हणाले की, सुप्रियाचं लग्न झालं त्यावेळी सगळ्यांनी सुप्रियाच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत केलं, सुप्रिया माझी मुलगी आहे, असं सर्वांना वाटत होतं, हे कधी मी विसरू शकत नाही.
तुतारी निशाणी सर्वत्र पोहचलेली
राज्यातील प्रत्येक शहरात, गावात तुतारी निशाणी पोहोचली आहे. मी लोणावळ्यामधून येत होतो, तेव्हा त्या घाटात ट्रॅफिक जाम झालं त्यावेळी एका शाळेची बस तिथे उभी होती. पोलिसांनी माझी गाडी पुढे काढली आणि त्यानंतर बसमधील मुलांनी माझ्याकडे बघितलं आणि हाताने तुतारी चिन्ह केलं. त्यावरून लक्षात येते की, लहान मुलांपर्यंत चिन्ह पोहोचलं म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचलं असल्याचे पवार म्हणाले.