नागपूर : राज्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी होताना दिसून येत आहे. त्यातच आज याच मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ झाला. सीमा प्रश्नावर सभागृहात ठराव न मांडल्याने आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निलंबन मागे घ्या अशी सभागृहात विनंती करुनही सरकारने दुर्लक्ष केल्याने महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला.
आजच्या विधानसभेच्या कामकाजाची सुरुवात विरोधकांनी सीमावादाच्या मुद्द्यावरून केली. दरम्यान, सीमावादावर विरोधकांनी प्रस्ताव मांडण्याची मागणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात उपस्थित नसल्याने हा प्रस्ताव उद्या म्हणजेच मंगळवारी सभागृहात मांडणार असल्याची माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारकडून बोलावणे आल्याने ते तातडीने दिल्लीला रवाना झाले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हा प्रस्ताव उद्या मांडण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, सरकारच्या या भूमिकेवर विरोधकांनी गोंधळ घालून सभात्याग केला.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नावर ठराव मांडावा अशी मागणी केली, मात्र ती मागणी मान्य करण्यात आली नाही. शिवाय आमदार जयंत पाटील यांचे निलंबनही मागे घ्यावे अशी मागणी केली.
मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला असल्याने निर्णय घेता येणार नाही अशी माहिती सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने महाविकास आघाडीच्या आमदारांनी कामकाजावर बहिष्कार टाकत व सरकारचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करून सभात्याग केला.