Download App

अजितदादांची जागा रोहित पवार घेत आहेत का? ‘बारामतीमध्येच’ मिळाले स्पष्ट उत्तर

मुंबई : बारामती. हे गावाचे नाव जरी काढले तरी दुसरे नाव येते ते शरद पवार (Sharad Pawar) यांचे. शरद पवार यांनी राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, उद्योग अशा वेगवेगळ्या माध्यमातून बारामती (Baramati) उभी केली. बारामतीला बालेकिल्ला तयार केले. पण 90 च्या दशकात ते दिल्लीच्या राजकारणात स्थिरावले आणि त्यानंतर त्यांचे पुतणे अजित पवार (Ajit Pawar) यांनी हा बालेकिल्ला संभाळला. पवारांनंतर बारामतीची सुत्रे अजित पवार यांच्या हातात गेली.

1993 साली शरद पवार बारामतीचे खासदार झाले अन् दिल्लीला गेले. तर दिल्लीत असलेले अजित पवार त्याचवेळी बारामतीचे आमदार झाले. तिथपासून अजित पवार यांनी बारामती सोडलेली नाही. मागच्या 30 ते 35 वर्षांपासून अजित पवार आणि बारामती हे एक वेगळेच समीकरणच बनले आहे. एक प्रकारे त्यांचे वर्चस्व तयार झाले आहे. अजितदादांचा वेगळा गट आणि चाहता वर्ग या जिल्ह्यात निर्माण झाला आहे. (Is Rohit Pawar replacing Ajit Pawar in Baramati)

हा चाहता वर्ग किती होता हे आकडेवारीत सांगायचे तर गत लोकसभेला बारामतीत लोकसभा मतदारसंघातील बारामती विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या कांचन कुल यांना 47 हजार 68 मते मिळाली होती. तर शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना एक लाख 74 हजार 986 मते मिळाली होती. बारामती विधानसभा मतदारसंघातून सुळेना एक लाख 27 हजारांचे लीड मिळाले होते.

‘मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प’; उद्धव ठाकरेंनी सांगितली भविष्यवाणी

पण त्याचवेळी विधानसभा निवडणुकीमध्ये याच बारामती विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या गोपीचंद पडळकर यांना 30 हजार मते मिळाली तर राष्ट्रवादीकडून अजित पवार यांना तब्बल एक लाख 95 हजार मते मिळाली. तब्बल एक लाख 65 हजार मतांच्या फरकाने अजितदादा विजयी झाले होते. सुप्रिया सुळेंपेक्षा अजितदादांना 38 हजार मते जास्त मिळाली.

कदाचित याच सगळ्यामुळे खुद्द शरद पवार यांनीही बारामतीमध्ये फारसे लक्ष घातले नव्हते. गावच्या सरपंचापासून ते मतदारसंघातील प्रकल्पांपर्यंतचे सगळे निर्णय अजित पवारच घेत असायचे. निवडणूक प्रचारालाही अजितदादा कधी बारामतीमध्ये नसतात. कन्हेरी येथील मारुती मंदिरात नारळ फोडून अजितदादा प्रचाराचा शुभारंभ करायचे. त्यानंतर थेट निवडणुकीच्या सांगता सभेलाच ते बारामतीला यायचे.

रोहित पवार यांनीही याच समीकरणामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघाचा रस्ता पकडला. तिथे त्यांनी पक्ष बांधला आणि 2019 मध्ये घड्याळाचा गजर केला. पण आता अजितदादांच्या बंडानंतर मात्र रोहित पवार यांनी बारामतीमध्ये आपला जम बसवायला सुरुवात केली आहे का? असा सवाल विचारला जात आहे. याचे कारण बारामतीमध्येच पाहायला मिळालेले एक चित्र.

उत्तर प्रदेशातही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष निनादणार! मुख्यमंत्री योगींनी काढलं पत्र

रोहित पवार यांना आज पुन्हा ईडीने चौकशीसाठी बोलावल्याने मुंबईत राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन सुरु होते. पण त्याचवेळी अजितदादांच्या बारामतीमध्ये रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. आज बारामती येथील प्रशासकीय भवना समोर रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी बांगड्या फोडत आंदोलन केले. यावेळी त्यांनी रोहित पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत ईडीचा जाहीर निषेध व्यक्त केला.

ही घटना किंवा प्रसंग वाटायला कदाचित लहान वाटू शकतो. पण ज्यांनी अजितदादांच्या बारामतीमधील राजकारणाचा अभ्यास केला आहे, ज्यांना अजितदादांच्या राजकीय ताकदीची जाणीव आहे, त्यांनाच या प्रसंगाचे महत्व लक्षात येऊ शकेल. आधीच रोहित पवार पक्षात अजितदादांची जागा घेऊ पाहात आहेत, अशी चर्चा सुरु असताना आता अजितदादांच्या बारामतीमध्ये रोहित पवार यांचे कार्यकर्ते पाहायला मिळाल्याने ते इथेही अजितदादांची जागा घेत आहेत का? असा सवाल विचारला जात आहे.

follow us